मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्षापासून कोरोनाची लाट आहे. या गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिलमध्ये ४५ दिवसांवर आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने हा कालावधी ९ नोव्हेंबर रोजी २ हजार २४४ दिवसांवर गेला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असाल तरी आम्ही परिस्थितीवर आणि रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
७ लाख ५८ हजार लोकांना कोरोना -
मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी मार्च महिन्यात आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत गेल्या दीड वर्षात ७ लाख ५८ हजार १८९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १६ हजार २८२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर २ हजार ७८० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी झाल्याने एकही झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. तर ज्या इमारतीमध्ये ५ रुग्ण आढळून येत आहेत, अशा १३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार २४४ दिवसांवर -
मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला होता. १ मे रोजी ९६ दिवस, १ जूनपासून ४५३ दिवस, १ जुलै रोजी ७३३ दिवस, १ ऑगस्ट रोजी १ हजार ४५८ दिवस, १ सप्टेंबर रोजी १ हजार ४७९ दिवस, १ ऑक्टोबर रोजी हा १ हजार १५९ तर १ नोव्हेंबर रोजी हा कालावधी १ हजार ५९५ दिवस तर ९ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २ हजार २४४ दिवस इतका नोंद झाला आहे. ऑगस्टमध्ये दिवसाला हा कालावधी २ हजार ५८ दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर पुन्हा हा कालावधी घसरला होता. आता नोव्हेंबरमध्ये हा कालावधी पुन्हा दोन हजार दिवसांच्यावर गेला आहे.
पालिका अलर्टवर -
मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने रोज २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत गणेशोत्सव व इतर सण साजरे झाले असले तरी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आलेले नाही. पावसाळ्यानंतर राज्याबाहेर गेलेले कामगार पुन्हा मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिका अलर्टवर आहे. रेल्वे स्थानकांवर राज्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनींग केली जात आहे. पुढील डिसेंबर दरम्यान रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना लागणारी औषधे, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. कोरोनासह इतर आजारांवरही पालिकेने लक्ष ठेवले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
काय असतो रुग्ण दुपटीचा कालावधी -
रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर दुपटीचा कालावधी कमी होतो. दुसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागल्यावर एप्रिल महिन्यात दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून आले. त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ४५ दिवसांवर आला होता. ऑगस्टमध्ये दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत असल्याने हा कालावधी २ हजार ५८ दिवसांवर पोहोचला होता. मात्र, आता हा कालावधी कमी होत आहे. याचा अर्थ कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हे ही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांचे मानखुर्द चेक पोस्ट अन्नत्याग आंदोलन, सदाभाऊ खोत देखील सहभागी