मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाची लाट असून दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना महापालिकेने न्यायालयात तिसरी लाट येणार नसल्याचे सांगितले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र महापालिका स्वतःच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेत असल्याने ही दुटप्पी भूमिका पालिका घेत असल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या सभा ऑनलाईन -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पालिका कोरोना रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटा मुंबईत येऊन गेल्या आहेत. ७ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून १६ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध लागू होते. कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागल्यावर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मंदिरे आणि शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. असे असताना महापालिकेच्या सभागृहाच्या, समित्यांच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेतली जात आहेत. यामुळे नगरसेवकांना आपले प्रश्न आणि समस्या मांडता येत नसल्याची तक्रार आहे.
हे ही वाचा -श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे तयारी पूर्ण; उद्या पहाटे 5 वाजता उघडणार मंदिर
स्थायी समितीच्या बैठकांना बसण्यास मज्जाव -
कोरोना संकट काळात संचारबंदी असल्याने महापालिकेच्या सभा आभासी पद्धतीने घेतल्या जात होत्या. मात्र, या सभांमध्ये लोकप्रतिनिधींना समस्या मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नाही, असा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला होता. आभासी सभेत विरोधकांचे आवाज म्यूट केले जातात, असा आक्षेप घेत इतर सर्व व्यवहार एकेक करून सुरळीत होत असताना महापालिकेच्या सभा ऑनलाइन कशाला, असा सवाल गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयाचा प्रत्यक्ष सभेबाबत निर्णय आला आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या सभेत भाजपा सदस्य उपस्थित राहिले असता त्यांना बैठकीत बसण्यास मज्जाव करण्यात आला. सत्ताधाऱ्यांचे हे वागणे असंसदीय असल्याची टीका शिंदे यांनी केली असून याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा -ठरलं... यंदा प्रत्यक्ष होणार शिवसेनेचा दसरा मेळावा? संजय राऊत यांची माहिती
सरकारने आदेश दिल्यावर प्रत्यक्ष बैठक -
महापालिकेच्या सभा ऑनलाईन नसल्याने नगरसेवकांना बोलायला संधी मिळत नाही. यासाठी सभा प्रत्यक्ष व्हाव्यात अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठी सत्ताधारी म्हणून आम्ही पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पालिका आयुक्त राज्य सरकारला पत्र देतील. राज्य सरकारने आदेश दिल्यावर प्रत्यक्ष सभा घेतल्या जातील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.