मुंबई : उद्योजक मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी ठाण्यातील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीमला गाळात रुतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. हिरेन हे गुरूवारपासून बेपत्ता होते. मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या मृत्युचे गूढ वाढले आहे. त्यांच्या मृत्युमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
मास्कखाली होते पाच रुमाल
मनसुख हिरेन याच्या तोंडावर असलेल्या मास्क खाली पाच हात रुमाल आढळून आले होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मास्क हटविल्यावर ही बाब समोर आली. याबाबत एक व्हिडिओही स्थानिकांनी काढला आहे.
मुलाने व्यक्त केली घातपाताची शंका
मनसुख हिरेन यांच्या मृत्युनंतर एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. हिरेन यांचा मुलगा आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांच्यातील हे संभाषण आहे. वडिलांचा मृत्यु हा घातपात असल्याची शंका त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.
कळवा रुग्णालयात सचिन वझेंची भेट
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असलेल्या कळवा रुग्णालयात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वझे हे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनी रुग्णालयाच्या डॉक्टर आणि स्थानिक पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते निघून गेले होते.
हिरेन यांनी केली होती मानसिक छळाची तक्रार
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेली स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आल्यानंतर त्यांची चौकशी केली जात होती. यादरम्यान तपास यंत्रणाकडून वारंवार तेच प्रश्न विचारले जात असून यामुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीची प्रतही समोर आली आहे.
मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास एटीएसकडे
मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हे प्रकरण एनआयएकडे देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. शंकेला वाव देणारे अनेक पुरावे समोर आले असून या प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
हेही वाचा - अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला; तपास 'एटीएस'कडे