मुंबई - शिवाजी पार्क येथील पीएनजी दाहिनीच्या अर्धवट राहिलेल्या कामाचे कंत्राट नव्या कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने हाणून पाडला. हे काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदाराचे काय झाले, किती टक्केने काम दिले होते, कंत्राट का रखडले तसेच नवीन कंत्राटाची रक्कम वाढवून का देण्यात आली अशाप्रकारच्या नगरसेवकांच्या प्रश्नांना प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीने परत पाठवला. परिणामी आधीच रखडलेले काम आणखी रखडणार आहे.
महापालिकेच्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनींचे पाईप नॅचरल गॅस आधारित ग्रीन स्मशानभूमीत रुपांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शिवाजीपार्क येथील भागोजी किर स्मशानभूमी व जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत अस्तित्वात असलेल्या विद्युत दाहिनींचे पीएनजीवर रुपांतर करण्यासाठी महापालिकेने स्थायी समितीची मंजुरी घेतली. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये मेसर्स जे अँड जे हॉटमॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली होती. त्यानंतर या कंपनीने शिवाजीपार्क येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनींच्या कामाला सुरुवात केली. परंतु हे काम पुढे अर्धवट सोडून देण्यात आले. त्यानंतर सातत्याने स्मरणपत्र देऊनही कंपनीने काम पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे शिवाजीपार्कसह ओशिवरा स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्यांची कामे रखडली आहेत.
आता पुन्हा नव्याने निविदा मागवून या कामांसाठी मेसर्स विचारे अँड कंपनीची निवड केली आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तर अर्धवट असलेल्या ओशिवरा स्मशानभूमीतील एका विद्युत दाहिनीचे रूपांतर पीएनजीत करण्याचे अर्धवट टाकलेले काम पुढे पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचे कंत्राट मेसर्स अडोर वेल्डींग लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने हे काम रखडले आहे. हे कंत्राट दोन कोटी रुपये खर्चाचे होते. या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र, प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रस्ताव परत पाठवण्यात आला. प्रशासनाच्या हलगर्जीपणात पीएनजी दाहिनीचे काम अजून रखडणार आहे.
काळ्या यादीतील कंत्राटदाराला काम -
जोगेश्वरीतील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीचे रूपांतर पीएनजीवर केले जाणार आहे. मात्र, हे काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडे शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीचे काम देण्यात आले. मात्र, या कंपनीने ओशिवरासह शिवाजी पार्कचेही काम अर्धवट सोडले. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून महापालिकेने नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यानंतर त्याच्यावर शिवाजी पार्कचे काम सोपवण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र, अर्धवट टाकलेले काम पुढे पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचे कंत्राट मेसर्स अडोर वेल्डींग लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. नवीन कंत्राटदाराला दिले जाणाऱ्या या कंत्राटदाराला नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.