मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 23 व 29 एप्रिलपासून सुरू होणार्या अनुक्रमे दहावी व बारावीच्या परीक्षाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नसून, परीक्षांसदर्भातील निर्णय आता मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे, शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि पालक संभ्रमात
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लादले आहेत. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. दरम्यान दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कडक निर्बंध असताना विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, कोरोनाची लागण झाली तर काय करायचे, परीक्षा पुढे ढकलण्यात येईल का? परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
'परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा'
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात आज शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यासंदर्भात चर्चा झाली. मात्र त्यावर योग्य तोडगा न निघाल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले आहे. ठरल्याप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये वर्षा गायकवाड या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - आणखी काही मंत्री राजीनामा देतील; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाकित