मुंबई - टेक्सटाईल म्युझियमच्या रुपात लवकरच वस्त्रोद्योग आणि मुंबई शहराने केलेली प्रगती याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. इंडिया युनायटेड मिलची जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. या जागेवर शंभर वर्षांपूर्वीच्या गिरणीच्या इमारतींपैकी 'हेरिटेज दर्जा' असलेल्या इमारतींचे मूळ रूपात संवर्धन केले जाणार आहे.
टेक्सटाईल म्युझियमच्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. डिसेंबर 2020पर्यंत 3 पैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महानगरपालिकेने दिली. जलपटावर मुंबई व कापड गिरणीचा इतिहास प्रदर्शित होणार आहे. गलगली यांनी महानगरपालिकेकडे निर्माणधीन टेक्सटाईल म्युजियमची विविध माहिती मागितली होती.
असे असणार टेक्सटाईल म्युझियम-
कोरोनाच्या संकटामुळे कामाला सहा महिन्यांच्या वाढीव कालावधी म्हणजे डिसेंबर 2020पर्यंत देण्यात आलेला आहे. टप्पा 1 अ चे काम 15 जानेवारी 2019रोजी सुरू झाले आहे. यामध्ये तळे व सभोतालचा परिसर सुशोभिकरण करून बहुउद्देशीय प्लाझा व वस्त्रोद्योगावर म्युरल तयार करण्यात येणार आहेत. यावर 6.03 कोटी खर्च येणार आहे. त्यासाठी 1.27 कोटी रुपये कंत्राटदार मेसर्स सवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला अदा करण्यात आले आहेत. बहुउद्देशीय प्लाझाचे बांधकाम सुरु आहे. टप्पा 1 ब अंतर्गत विविध प्रकारच्या नळीच्या तोंडाद्वारे संगीत कारंजे निर्माण करण्यात येणार आहे.
जलपटावर मुंबई व कापड गिरणीचा यांचा इतिहास प्रदर्शित करण्याकरिता लघुपट तयार करणे, प्रदर्शन करणे व पुढील 4 वर्षे प्रचलन व परिरक्षित करण्याचे काम करण्यात येणार आहे. या 4 वर्षांकरिता एकूण 28 विविध लघुपट निर्माण करुन जलपटावर प्रदर्शित करण्याचे काम आहे. हे काम 13 नोव्हेंबर 2019 रोजी सुरू झाले आहे. त्यासाठी एकूण खर्च 23.57 कोटी रुपये इतके आहे. दोन्ही कामात आर्किटेक्ट आणि सल्लागार सर जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहेत.
44 हजार चौरस मीटर जागेवर टेक्सटाईल म्युझियम
वर्ष 1890ला इंडिया युनायटेड मिल बांधण्यात आली. या गिरणीचे मुंबईसाठी आगळेवेगळे महत्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वाटयाला आलेल्या 44 हजार चौरस मीटर जागेवर टेक्सटाईल म्युझियम बांधण्यास सुरवात केली आहे. भविष्यात हे एक रमणीय स्थळ होऊ शकणार आहे. मुंबई आणि कापड गिरणीचा इतिहास सोबत लघुपटाचा आनंद मनसोक्त घेता येईल, असे अनिल गलगली यांनी मत व्यक्त केले आहे.