मुंबई - बोरिवली परिसरामध्ये चालत्या बेस्ट बस मध्ये लूट करणाऱ्या बाप-लेकासह 5 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अटक केले आहे. बोरिवली मधील हिरे व्यापारी सागर केतन शहा यांच्याकडील 24 लाख रुपयांचे हिरे लुटण्याच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रॉपर्टी सेल त्यांचा तपास करत होती. याप्रकरणी कल्याणमधून 5 आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शर्टावर किडा असल्याचे सांगून हिरे लांबवले
बोरिवली परिसरात राहणारे सागर केतन भाई शहा (वय, 38) त्यांच्याकडील 24 लाख रुपयांचे हिरे घेऊन 13 एप्रिल रोजी बेस्ट बसने प्रवास करत होते. परंतु, हिरे लंपास करणारी टोळी व्यापाऱ्याचा पाठलाग करत होती. व्यापाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी टोळीतील एका व्यक्तिने त्याच्या शर्टवर किडा असल्याचे व्यापाऱ्यास सांगितले. यावर त्या व्यापार्याने मागे वळून पाहिले असता, त्याच्या जवळ असलेली हिऱ्यांची बॅग घेऊन आरोपी फरार झाले. त्यानंतर यासंदर्भात बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण प्रॉपर्टी सेल कडे वर्ग करण्यात आले होते.
झाडाच्या कुंडीत लपवले हिरे, घरात पाळली दहा कुत्री
पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी कल्याण परिसरात राहणारे असल्याचे समोर आले. यासंदर्भात अनिल गायकवाड (वय, 53), त्याचा मुलगा विशाल गायकवाड (वय, 27), सय्यद रफिक सय्यद नजीर अली (वय, 37), संदीप दळवी (वय, 43), जब्बार अजीज (वय, 58) या आरोपींना अटक केलेली आहे. अनिल गायकवाड या आरोपीने त्याच्या घरातील एका झाडाच्या कुंडीत हिरे लपून ठेवले होते. आपल्याला शोधत पोलीस आपल्यापर्यंत येतील या भीतीने आरोपीने त्याच्या घरामध्ये काही पाळीव कुत्रे बांधून ठेवले होते. जेणेकरून पोलिसांना त्यास अटक करण्यासाठी अटकाव केला जाईल.
हेही वाचा - मुंबई : 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक