मुंबई - आज सकाळीच मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानक दादर येथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक आणि लांब पल्ल्यांच्या गाड्याचं वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सिग्नलमधील बिघाड आता दूर करण्यात आला आहे. मात्र, लोकल वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील मार्गस्थ झाल्या आहेत. सकाळी आठच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे उपनगर दिशेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला होता. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली. तसेच सकाळच्या वेळी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहचायला देखील त्यामुळे उशीर झाला.
सकाळच्या उपनगरातून लाखो कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करतात. खास करून सकाळच्या वेळेस प्रवाशांची संख्या खूप अधिक असते. मात्र सकाळच्या वेळीच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना कार्यालयात पर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रेल्वे रुळावर रखडल्या असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, आता सिग्नलमधील बिघाड दूर केल्यानंतर रेल्वे वाहतूक सेवा पुर्वपदावर आणण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे.