मुंबई - प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक आणि सत्ताधारी चहापान करत अधिवेशनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र, सध्या राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 5 जुलैला होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. तर, तिथेच अधिवेशनात मांडले जाणारे ठराव, तसेच महत्त्वाच्या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी घेतली जाणारी पत्रकार परिषदही मुख्यमंत्र्यांकडून टाळण्यात आली आहे.

हेही वाचा - विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर?
चहापानाचा कार्यक्रम रद्द
विरोधक आणि सत्ताधारी पक्षात ताळमेळ आणण्यासाठी, तसेच अधिवेशनाचा कार्यकाळ सहकार्याच्या भावनेने पार पडावा म्हणून चहापानाचा कार्यक्रम आखला जातो. पण, गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला जात आहे. तसेच सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आखला गेला नाही. तर, चहापानामुळे होणाऱ्या गर्दीने जनसामान्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो म्हणूनही हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असावा, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद टाळली
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री हे पत्रकारांशी संवाद साधून अधिवेशनात असलेल्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगत असतात. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेसंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. यासोबतच मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर अधिवेशनात होणाऱ्या कार्यक्रमाची कोणतीही माहिती पत्रकारांना न सांगता मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री निघून गेले. पत्रकार परिषदेबाबत अधिकृत घोषणा नसूनही जवळपास दोन ते अडीच तास मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील म्हणून पत्रकार सह्याद्री अतिथीगृहात वाट पाहत होते. मात्र, त्यांना कोणताही संदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला नाही. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेणे टाळले.
हेही वाचा - अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, जबरदस्ती कारवाई न करण्याची मागणी