मुंबई - 20 जून रोजी विधान परिषदेसाठी झालेल्या दहा जागांवर निवडून आलेल्या आमदारांचा आज ( शुक्रवारी ) विधान भवनात शपथविधी पार पडला. विधान भवनाच्या ( Vidhan Bhavan Mumbai ) सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी ( MLC sworn in Mumbai ) पार पडला असून, भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तसेच काँग्रेसकडून भाई जगताप यांनी शपथ घेतली आहे.
20 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य घडले होते. याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड करत महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचले. त्यानंतर राज्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे यांचा सरकार स्थापन झाले. त्यामुळे यावेळी झालेली विधान परिषदेची निवडणूक ही सत्ता बदलासाठी अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.