मुंबई- 2020 या वर्षामध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि विवादात राहिलेल्या विषय असेल तर तो म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या संदर्भात करण्यात आलेला तपास. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस तपास करीत असताना याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेला तपास व सीबीआय कशाप्रकारे आता तपास करत आहे व ईडी , नार्कोटिक्स ने केलेल्या कारवाईचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
घटनाक्रम व मुंबई पोलिसांनी केलेला तपास -
14 जून या दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या बांद्रा स्थित घरात आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. यावेळेस मुंबई पोलिसांनी सुशांतच्या घरातून तो वापरत असलेली एक डायरी, 3 मोबाईल फोन, एक लॅपटॉप यासह इतर गोष्टी हस्तगत केल्या होत्या. सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे शव पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या ठिकाणी कुपर रुग्णालयाच्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी सुशांत सिंगच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून त्याचा अहवाल दिलेला होता. या अहवालामध्ये सुशांत सिंगच्या अंगावर कुठल्याही जखमा डॉक्टरांना आढळून आलेल्या नव्हत्या.
56 जणांचे नोंदवले जबाब-
सुशांतने आत्महत्या केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठा वाद निर्माण झाला होता. सुशांत सिंगची आत्महत्या ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप वेगवेगळ्या क्षेत्रातून होत होता. या संदर्भात तपास करणार्या मुंबई पोलिसांनी या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक महेश भट , संजय लीला भन्साळी , आदित्य चोप्रा या बरोबरच सुशांतच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या बहिणी, वडील सहकारी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. याबरोबरच सुशांत सिंगचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि सुशांत सिंगचा नोकर निरज व कुक केशव, चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर, सुशांतचा अकाउंटंट रजत मेवानी यांच्यासह तब्बल 56 जणांची चौकशी करून त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले होते.
सुशांतच्या बँके व्यवहारांचे झाले फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट-
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये सुशांतची आर्थिक फसवणूक झाली होती, असा आरोपही केला जात होता. यासाठी पोलिसांनी सुशांत सिंगच्या नावावर असलेल्या काही कंपन्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तब्बल चार बँकांचे स्टेटमेंट घेऊन ते फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टला पाठवले होते. फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टची पडताळणी केल्यानंतर हा अहवाल सुद्धा मुंबई पोलिसांना प्राप्त झाला होता. यात आर्थिक व्यवहारात कुठलीही अफरातफर नसल्याचे समोर आले होते. सुशांत सिंगचा विसेरा रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाठवण्यात आला होता. मात्र हा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला. सुशांतच्या पोस्ट मार्टममध्ये त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आलेले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये सुशांत सिंगच्या अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. मात्र असे असले तरीही या संदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू ठेवण्यात आला होता.
सुशांत 2013 पासून मानसिक तणावाखाली असल्याची कुटुंबाची माहिती-
सुशांतच्या कुटुंबातील सदस्य प्रियांका तन्वर तिचे पती सिद्धार्थ तन्वर व बहीण नीतू सिंग यांनी मुंबई पोलिसांना जबाब दिला होता. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटले होत की 'सुशांत हा मानसिक दडपणाखाली असल्याचा आम्हाला 2013 पासूनच माहित होते'. सुशांतने आत्महत्या केली होती. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणावरही संशय नसल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते. मात्र अचानक 25 जुलैला सुशांतचे वडील केके सिंग यांनी बिहार पोलिसांकडे सुशांत सिंगची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत येऊन चौकशी करत होते. यावरही मोठा वाद निर्माण झाला. मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास हा मुंबई पोलिसांकडे राहणार असून बिहार पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे कायद्यानुसार वर्ग करावा, असे खुद्द मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटले होते.
मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका-
सुशांत सिंगच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातून मागणी करण्यात येत होती. त्याला अनुसरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली. ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्यांची बाजू सुद्धा मांडली होती. मात्र सुशांत सिंग याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात काही अडचण असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने तपास करावा, असे आदेश दिले होते. याबरोबरच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना मिळालेले पुरावे व त्यांनी घेतलेल्या एकूण व्यक्तींची स्टेटमेंटही सीबीआयला द्यावी, असे आदेश दिले होते.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास-
दिल्लीतून सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाल्यानंतर तपासासाठी काही टिम बनवण्यात आल्या होत्या. एका पथकावर जबाबदारी देण्यात आली होती, की सुशांतच्या घरी घडलेल्या घटनेचा रिक्रिएशन करून त्याचा अहवाल देणे. दुसरे पथक सुशांत सिंग याच्या आत्महत्या संदर्भात मुंबई पोलिसांशी समन्वय साधून मुंबई पोलिसांकडून योग्य ती मदत घेण्याचं काम देण्यात आले. तिसऱ्या पथकाकडे सुशांतच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहार तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर चौथ पथक हे मुंबईतील डीआरडीओ कार्यालयात बसून सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणा संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करत आहे.
सीबीआयने आतापर्यंत केलेला तपास-
सीबीआयचे पथक मुंबईत चौकशी करत असताना एनसीबीकडून अमली पदार्थांच्या संदर्भात तपास सुरू करण्यात आला होता. तर, ईडीकडून आर्थिक प्रकरणांचा तपास करण्यात आला. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, शोभा चक्रवर्ती यांच्यासह सिद्धार्थ पिठाणी , नीरज , केशव, सॅम्युअल मिरांडा , दीपेश सावंत , श्रुती मोदी व जया शहा यांच्यासह वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे. सुशांतचे चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर व अकाउंटंट रजत मेवाणी यांचीसुद्धा चौकशी सीबीआयने केलेली आहे.
सुशांत सिंगच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी सीबीआयच्या टिमकडून सायकॉलॉजिकल अटोप्सीची मदत घेतली गेली. मात्र एवढे सगळे करुन सुद्धा अजूनही सुशांतने आत्महत्या केली? त्याची हत्या झाली? किंवा हा अपघाती मृत्यू होता का? याचा तपास सीबीआयला करता आलेला नाही. सुशांत सिंगच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा शोध सुद्धा सीबीआयच्या पथकाला घेता आलेला नाही.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्तीसह अमलीपदार्थ तस्करांना अटक व सुटका-
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अमली पदार्थांचं सिंडिकेट आहे का? याचा तपास करण्यासाठी ईडीडून देण्यात आलेले व्हाट्सअप चॅट एनसीबीला मिळाल्यानंतर एनसीबीने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तपास करून या प्रकरणी कैजाण, अब्बास, जैद विलंत्री, बासित या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता, त्यांनी रियाचा भाऊ शोविकला अमलीपदार्थ पुरविल्याचे कबुल केले.
त्यानंतर कैजाण, सॅम्युअल मिरांडा (सुशांतचा हाऊस मॅनेजर) शोविक चक्रवर्ती (रिया चक्रवर्तीचा भाऊ ) रिया चक्रवर्ती यांना अटक करण्यात आलेली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे, की अटक करण्यात आलेल्या जैद हा आरोपी सॅम्युअल मिरांडाच्या माध्यमातून शोविक चक्रवर्तीच्या संपर्कात होता व अमलीपदार्थांच्या संदर्भात दोघांमध्ये वार्तालाप व्हाट्सअप वर झालेला होता. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतरही जैद याने सॅम्युअल मिरांडा याच्या माध्यमातून शोविक चक्रवर्तीला अमलीपदार्थांचा पुरवठा केला होता. रिया चक्रवर्ती शोविक चक्रवर्ती आणि धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसाद यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
ईडीकडून गौरव आर्याची चौकशी-
ईडी कडून रिया चक्रवर्ती आणि कथित ड्रग डीलर गौरव आर्या यांच्या मधले व्हाट्सअप चॅट जाहीर केल्यानंतर या संदर्भात ईडीकडून गौरव आर्या यास चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. सलग दोन दिवस चौकशी केल्यानंतर गौरव आर्या याने ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की रिया चक्रवर्तीला मी ओळखत असून सुशांतला मी कधी भेटलो नव्हतो किंवा त्याला ओळखत सुद्धा नव्हतो.