पालघर : वाढवण बंदर ( wadhwan port ) विरोधात वाढवण परिसरातील गावांचा असलेला आक्रोश राज्य व केंद्र सरकार ( State and Central Government ) पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई ते आरोंदा (रत्नागिरी) या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मच्छीमार गावांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या व मच्छीमार संघटनांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला. मच्छिमार गावातील मासे बाजार, मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, डायमेकिंग व्यवसाय स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवून गावागावात मुख्य रस्त्यांच्या बाजूला नागरीकांनी मानवीसाखळी तयार करून सरकारला खणखणीत इशारा दिला आहे.
प्रचंड मोठी मानवीसाखळी : वाढवण बंदर परिसरातील धाकटी डहाणू ते चिंचणी खाडीनाका येथील मुख्य रस्त्याच्या कडेला 15 किलोमीटर पर्यंत जवळपास वीस हजार लोकांनी प्रचंड मोठी मानवीसाखळी तयार करत विरोध आणि निषेध व्यक्त केला आहे. मानवी साखळीत वाढवण, वरोर, चिंचणी, बहाड, पोखरण, धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, वासगाव, ओसारवाडी, तणाशी, चंडीगाव, दांडेपाडा अशी अनेक गावे सामील झाली होती.
अनेक घोषणानी दुमदुमला आसमंत : मानवी साखळीतील शेकडो महिलांनी एकाच रंगाच्या साड्या, तर शेकडो तरुणांनी एकच जिद्द वाढवण बंदर रद्द चे घोषणापत्र लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते, या मानवीसाखळीत वाढवण बंदर विरोधात जब बनेगा वाढवण बंदर, तब डूबेगी मुंबई, समुद्र आमच्या कोळ्यांचा, नाही कुणाच्या बापाचा, एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द अशा अनेक घोषणानी आसमंत दुमदुमून गेला होता.
आंदोलन शांततेत पार पडले : मानवी साखळीत तान्ही लहान बाळ घेऊन काही महिला सामील झाल्या होत्या तर, आबालवृद्ध, तरुण-तरुणी, महिला व मुले यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर व्यावसायिक यांना उध्वस्त करणारे प्रस्तावित वाढवण बंदर कायमचे हद्दपार करण्याची मागणी केली आहे. यावेळी वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी, अल्पेश विसे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी ही मागविण्यात आली होती. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने मानवी साखळी आंदोलन शांततेत पार पाडण्याच्या केलेल्या आवाहनाला येथील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याने हे आंदोलन शांततेत पार पडून पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.