मुंबई - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुकांची अद्याप घोषणा केलेली नाही. राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई विरार महापालिकेची ही मुदत संपत आल्याने या महापालिकांवर प्रशासक नेमावा, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केली आहे.
राज्यातही कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, या काळात निवडणूक होणे शक्य होणार नाही. कोरोनामुळे निवडणूक कोणत्या काळात होईल, असे आताच सांगणे अवघड असल्याने सरकारने नियोजित निवडणुका असलेल्या नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई विरार या महापालिकांमध्ये प्रशासक नेमावा, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. विशेष म्हणजे आजच 28 एप्रिलला औरंगाबाद महापालिकेची मुदत संपली आहे. तर नवी मुंबई महापालिकेची सात एप्रिलला मुदत संपणार आहे. वसई - विरार महापालिकेची मुदत येत्या 28 जूनला संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढच्या दोन महिन्यात निवडणूक होणे शक्य नाही.
जुलैनंतरही पावसाळा असल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने या महापालिकांवर प्रशासक नेमण्याची सूचना केली आहे. दरम्यान अद्याप सरकारने प्रशासक नियुक्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली नसून पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाच्या सूचनांची अमलबाजवणी होऊ शकते, असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान बदलापूर व अंबरनाथसह विविध 9 नगरपरिषदांच्या मुदत येत्या काही दिवसात संपत आहेत. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद त्यानंतरच्या 15 पंचायत समित्याच्या मुदत येत्या काही दिवसात संपत आहेत. करोनामुळे त्यांच्या निवडणुका घेणे शक्य होणार नसल्यामुळे संबंधित ठिकाणी प्रशासक नेमण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी, अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आहे.