मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. तर दुसरीकडे दररोज कोरोनाचे मृत्यू मोठ्या संख्येने होत आहेत. मात्र, गेल्या आठवड्याभरात राज्यातील मृत्यूदर कमी होत असल्याचे दिसून आले असल्याची माहिती साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. सध्या ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रांवर भर दिला जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. परंतु, वेळेत निदान होत असल्याने आता गंभीर रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे. परिणामी राज्यातील मृत्यू दर 5 टक्क्यांवरून आता 4.27 टक्क्यांवर आला आहे. तर आता तो आणखी कमी करणे हेच लक्ष्य असल्याचेही डॉ. आवटे यांनी सांगितले.
राज्यातील रुग्णांचा आकडा 2 लाखांचा टप्पा पार करून पुढे गेला आहे. दररोज 7 ते 8 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. हा आकडा सर्वसामान्याची चिंता वाढवणारा आहे. पण डॉ. आवटे यांच्या म्हणण्यानुसार राज्यात टेस्टिंग वाढवल्याने रुग वाढत आहेत, निदान लवकर होत आहे. त्यामुळे ही बाब एकार्थाने दिलासा दायक आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे ही प्रमाण वाढत आहे.
हेही वाचा - विमा कंपनीने पुसली शेतकऱ्याच्या तोंडाला पाने, नुकसान भरपाई ४ रुपये ३४ पैसे
मृत्युदर कमी करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेंट ही त्रिसूत्री अवलंबली जात आहे. त्यानुसार एखादा रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना ट्रेस करणे, हाय रिस्क नागरिकांना ट्रेस करणे आणि त्यांच्या टेस्ट करणे यावर आता भर देण्यात आला आहे. तर टेस्टिंगनंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाना वेळेत ट्रिटमेंट (उपचार) दिली जात आहे. त्यामुळे आता हळूहळू रुग्ण गंभीर होण्याची संख्या कमी होत आहे. परिणामी मृत्युदर कमी होण्यास मदत होत आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्याभरात 5 टक्के असलेला 5 जुलैला मृत्यू दर 4.27 टक्क्यांवर आल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले आहे.
जून महिन्यापासून राज्यात टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली आहे. आधी जिथे 14 हजार टेस्ट व्हायच्या तिथे आता 26 हजार टेस्ट दिवसाला होत आहेत. तर देशात 10 लाख लोकसंख्येच्या मागे 6500 टेस्ट होत असतील तर महाराष्ट्रात 8500 टेस्ट होतात. तर महिन्याभरात राज्यात अंदाजे 40 लॅब वाढण्यात आल्या आहेत. आजच्या घडीला 115 लॅब कार्यरत आहेत. यामुळेही रूग्ण वाढत आहेत. पण मृत्यू दर हळूहळू कमी होत असल्याने, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत. ही बाब दुसरीकडे दिलासा देणारी ठरत आहे, असेही ते म्हणाले.