मुंबई - देशभरात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मुंबईत मात्र महिलांचे लसीकरण कमी होत असल्याने त्यांच्यासाठी शुक्रवारी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल १ लाख २७ हजार ३५१ महिलांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी मुंबई महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर १ लाख ७ हजार ९३४ महिलांना लस देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ कोटी ९ लाख ८६ हजार डोस -
मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १ कोटी ९ लाख ८६ हजार ८३ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ७६ लाख ५४ हजार ४४३ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ३३ लाख ३१ हजार ६४० लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीकरणादरम्यान मुंबईत अनेकवेळा १ ते दीड लाख लाभार्थ्यांना एकाच दिवशी लस देण्यात आली आहे.
१ लाख २७ हजार महिलांना लस -
लसीकरणात महिलांचे प्रमाण कमी असल्याने महापालिकेने आठवड्यातून एक दिवस महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सरकारी, पालिकेच्या आणि खासगी लसीकरण केंद्रांवर १ लाख २७ हजार ३५१ महिलांना लस दिली गेली. त्यापैकी मुंबई महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर १ लाख ७ हजार ९३४ महिलांना लस देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महिलांना थेट येवून (वॉक इन) कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती.
लसीकरण मोहीम -
मुंबईत १६ जानेवारी पासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचारी, जेष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने १९ मे ला घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने २५ मे पासून स्तनदा मातांचे व गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू केले. अंथरुणाला खिळून असलेल्या, मनोरुग्ण नागरिक, ओळखपत्र नसलेले नागरिक, जेलमधील कैदी, तृतीयपंथी यांचेही लसीकरण केले जात आहे. तसेच आता महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.