मुंबई - लॉकडाऊनमुळे नागरिकांना सर्व सण घरातच साजरे करावे लागत आहेत. सोशल मीडिया आणि कलेच्या माध्यमातून रमजान ईददेखील साजरी करण्यात येणार आहे. कलेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश चौहान यांनी आपल्या कलेतून अनोख्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. पक्ष्याचे पीस घेऊन त्यावर मशीद, चंद्र, नमाज पडणारा मुस्लीम बांधव यांच्या प्रतिमा रेखाटत खास 'ईटीव्ही भारत'साठी रमजान ईदच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
टर्की या पक्षाच्या पंखावर निलेश यांनी रमजानचा देखावा साकारला आहे. दोन दिवसाचा कालावधी ही कलाकृती साकारण्यासाठी निलेश यांना लागला. दोन महिने टाळेबंदी असल्यामुळे लोकांचे रोजगार ठप्प आहेत. यामुळे मुस्लीम बांधवाचा महत्त्वाच्या सणाला आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्यासाठी निलेश यांनी ही कलाकृती साकारली आहे.
मुस्लीम बांधवाना यावेळी ईद जल्लोषाने साजरी करता येणार नाही. यामुळे ही कलाकृती साकारत त्यांना शुभेच्छा देत आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी मला दोन दिवस लागले. तसेच हे पंख मी ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहे, त्याच्याकडून घेतले आहे, असे निलेश यांनी सांगितले.