मुंबई - सुशांत सिंह अत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'कडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यानंतर आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटचा मालक असून एका रिक्षा ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी ड्रग माफियांच्या सिंडिकेट समोर आल्यानंतर यासंदर्भात एनसीबीकडून तत्काळ मोठी कारवाई करण्यात येत असून दोन दिवसांत सहा जणांवर कारवाई करण्यात आली. हे सहाजण ड्रग्स पेडलर असून यामध्ये करंजीत सिंग आनंद , डिवाइन फर्नांडिस , संकेत पटेल , अंकुष अर्जन, संदीप गुप्ता , फतेह अन्सारी अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
एनसीबीकडून रिया चक्रवर्तीची सलग 3 दिवस चौकशी करण्यात आल्यानंतर या चौकशीदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला महत्त्वाची माहिती मिळाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाने बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेते, प्रोडक्शन हाऊस व दिग्दर्शकांची नावं घेतलेली आहेत. त्यानुसार या सर्व व्यक्तींना लवकरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे.
सध्या सोशल माध्यमांवर बॉलिवूडमधील विविध नट-नट्यांची नावे या संदर्भात जोडली जात आहेत मात्र, ती परिस्थितीला धरून नसल्याचाही एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेला आहे. आम्ही या संदर्भात तपास करत असून लवकरच संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले, जाईल असे त्यांनी म्हटले आहे.