मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना येत्या काही महिन्यात मुंबईत तिसरी लाट येणार असून त्यात लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
लहान मुलांसाठी कोविड सेंटर -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही, त्यातही तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पुणे महापालिकेमार्फत लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसह त्यांच्या पालकांना राहण्याची सोय, लहान मुलांसाठी पक्षी, प्राण्यांची चित्रे, खेळणी, लहान मुलांची व्हिडीओ गाणी अशा अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. तरी पुणे महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेमार्फत देखील लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात यावे. तसेच यासाठी आवश्यक बालरोग तज्ञांची देखील नेमणूक करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य शिरसाट यांनी केली.
कोविड सेंटरमध्ये २० हजार खाटा -
मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे लहान मुलांसाठी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. एक वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना येथे दाखल केले जाणार असून लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या कोविड सेंटरमध्ये ७० टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर २०० आयसीयू खाटा असणार आहेत. हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र ३१ मे पूर्वी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच मुंबईत तीन ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरु झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. आताची चारही जम्बो कोविड सेंटर उभारताना आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा उभारता येणार आहेत. जूनच्या मध्यावधीपर्यंत साडेसहा हजार अतिरिक्त खाटांची जम्बो कोविड सेंटर उभी राहतील. येत्या काळात एकूण ११ जम्बो कोविड सेंटर असतील. यात एकूण सुमारे २० हजार खाटा असणार आहेत व ती १०० टक्के ऑक्सिजनवर आत्मनिर्भर असलेली असतील.
6 लाख 96 हजार एकूण रुग्ण -
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 96 हजार 379 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 14 हजार 574 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 51 हजार 216 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 508 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 326 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 62 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 246 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 264 तर आतापर्यंत एकूण 60 लाख 48 हजार 686 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.