मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "प्लास्टिक द्या मास्क घ्या" हा अभिनव उपक्रम मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू केलेला आहे. मात्र, या उपक्रमाला मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 20 दिवसांत 50 किलो प्लास्टिक गोळा करुन फक्त 40 मास्क वितरित केले आहेत. इतकंच नव्हे तर, या स्टॉलवर रेल्वे गाड्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक प्रवासी येत असल्याने स्टॉलधारकांची डोके दुःखी वाढली आहे.
रेल्वेच्या "प्लास्टिक द्या, मास्क घ्या" उपक्रमाला अल्प प्रतिसाद काय आहे उपक्रम- बृहन्मुंबई महानगरपालिका, स्त्री मुक्ती संघटना आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त विद्यमानाने सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक द्या मास्क घ्या" उपक्रम सुरू केला आहे. यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर स्टॉल उभारण्यात आलेला आहे. सर्व प्रकारचे प्लॅस्टिक कचरा जसे कीपॅड, बॉटल, पॉलिथिन, पिशव्या इत्यादी साहित्य जमा करून या संकलन स्टॉलवर दिल्यास त्यांना कापडी मास्क देण्यात येणार आहे. यासाठी विनिमय दर ठेवण्यात आलेले होते. मात्र, पाहिजे तितका प्रतिसाद रेल्वे प्रवाशांकडून या उपक्रमाला मिळत नाही आहे.
रेल्वे प्रवाशांच्या अल्प प्रतिसाद-
स्त्रीमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रति मास्कसाठी 10 प्लास्टिक बॉटल, 1-2 किलो वाहण्याची क्षमता असलेल्या 15 प्लास्टिक पिशव्या, 100 ग्राम वजन पेलू शकणारे खाद्यपदार्थ 20 पाकिटे, दात घासण्याचे 20 ब्रश किंब स्ट्रॉ देता येणार आहेत. आम्हाला अपेक्षा होती की या उपक्रमाला रेल्वेप्रवासी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील. मात्र आतापर्यंत 40 ते 50 किलो प्लास्टिकच्या बदल्यात फक्त 40 मास्क देण्यात आले आहेत. सुरुवातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि प्रवासी या स्टॉलवर येऊन विचारपूस करून माहिती पत्रक घेऊन जात होते. मात्र पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही.
प्रवाशांच्या विचारपूस जास्त-
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी या स्टॉलला भेट देतात. मात्र प्लास्टिक देण्यासाठी आणि मास्क घेण्यासाठी नाही तर कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी उभी आहे. त्याची माहिती विचारत असतात. तर काही प्रवासी रेल्वेचे वेळापत्रकाबद्दल विचारणा करतात. त्यामुळे आमची डोकेदुखी वाढलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की उर्वरित दहा दिवसात तरी मुंबईकरांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल. हा उपक्रम एक महिन्यासाठी आहे, अशी माहिती स्टॉलवर असलेल्या कार्यकर्त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा- आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये