मुंबई - विकासाच्या नावाखाली मुंबईत कायदेशीररित्या आणि बेकायदाही कत्तल होताना दिसतात. पण आता जाहिरातीचा फलक ठळकपणे दिसावे, यासाठी राजरोसपणे बेकायदारित्या मोठ्या आणि जुन्या झाडांची कत्तल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावदेवी येथील चौपाटी रोड येथील 30 ते 35 वर्षे जुने वडाचे झाड रात्री बेकायदा कापण्यात आले आहे. ही बाब डॉ. अनहिता पुंडोले यांनी समोर आणल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या कनिष्ठ वृक्ष अधिकारी, डी विभाग यांच्याकडून जाहिरात कंपनीच्या मालकाविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
डॉ अनहिता यांनी तात्काळ डी विभागातील वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार मिलिंद नरोडे, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, डी विभाग यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेव्हा ही बेकायदा कत्तल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तात्काळ याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यु श्रीनिकेतनच्या टेरेसवर जाहिरातीचा फलक आहे. त्यावर बँक ऑफ बडोदाची जाहिरात आहे. ही जाहिरात व्यवस्थित दिसावी यासाठी वडाच्या झाडाची बेकायदा कत्तल करण्यात आली असून हा गुन्हा आहे. त्यानुसार मी गावदेवी पोलीस ठाण्यात जाहिरात कंपन्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील तपासात काय समोर येते त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे नरोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. दरम्यान पर्यावरणप्रेमी, सेव्ह ट्रीकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर पालिकेच्या दुर्लक्षामुळेच बेकायदा कत्तल करणाऱ्याचे फावत असल्याचे म्हणत असे प्रकार रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.