मुंबई - शिवसेनेकडून ( Shiv Sena ) मशाल चिन्हावर ( Mashal symbol ) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे अशी सूत्रांनी माहीती दिली आहे.तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाने मागवला होता. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांची आज मातोश्री येथे बैठक झाली, दरम्यान मशाल चिन्हावर एकमत झाल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत एकमत - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हावर गदा आणली. तसेच सोमवारी एक वाजेपर्यंत पर्यायी चिन्ह निवडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यायी तीन चिन्हांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. दरम्यान, मशाल चिन्हा बाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेच्या चिन्हाला तात्पुरती स्थगिती - बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष, चिन्हावर दावा ठोकला. शिवसेनेने यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबत नेमलेल्या घटनापीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा चेंडू टोलावला. निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर, नावावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. शिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी तीन चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय आयोगाकडे शिवसेनेने पर्यायी नाव दिल्याचे समजते.
मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची मातोश्री निवासस्थानी बैठक घेतली. दरम्यान उगवता सूर्य, मशाल, त्रिशूल चिन्हाबाबतचा प्रस्ताव ठाकरे यांनी बैठकीत सर्वांसमोर मांडला. शिवसेनेकडून यावेळी मशाल चिन्ह जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी १ वाजता निवडणूक आयोगासमोर प्रस्ताव मांडल्यानंतर ते परवानगी देतात का.? हे पाहणे महत्वाचे आहे