मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई येथे काहीश्या एकतर्फी निकाल पाहावयास मिळाले. दक्षिण-मध्य मुंबई येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड हे मैदानात होते. त्यांना राहुल शेवाळे यांचे कडवे आव्हान होते. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीपासून शेवाळे यांनी आघाडी घेत शेवटी 1 लाख 52 हजार मतांनी काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांना मागे टाकले.
यात वंचित आघाडीच्या संजय भोसले 63153 इतकी मत शेवटच्या फेरीत पडली. त्यामुळे काँग्रेसची मते वंचित आघाडीने खाल्ली, असे सर्वत्र बोलले जाते. दक्षिण मध्य मुंबईत अप्रत्यक्षपणे वंचित आघाडीचा शिवसेनेला कुठेतरी फायदा झाला असे शिवसेना नाकारत असेल तरीही फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले आहेत.
तसेच दक्षिण मुंबई या मतदारसंघातून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचे विजयासाठी खूप नाव निकालापूर्वी चर्चिले होते. परंतु आज मतमोजणीला सुरुवात झाली आणि काहीसे चित्र उलटेच स्पष्ट होत गेले. पहिल्याच फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत हे आघाडीवर होते. ते शेवटपर्यंत एकविसाव्या फेरीपर्यंत तसेच आघाडीवर राहत अखेर विजयी झाले. त्यामुळे काही दिवसापूर्वी या दक्षिण-मुंबई मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासाठी मोठे मोठे उद्योगपती तसेच अब्जावधी मुकेश अंबानी यांनी देखील प्रचार केला होता. त्याचा त्यांना कुठेतरी फायदा होईल, असे दिसले होते. परंतु, आज निकाल लागला व चित्र पूर्ण उलट पाहावयास मिळाले आहे.