मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, डॉक्टरांपेक्षा कंपाउंडर बरे, असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या डॉक्टर्सनी केली आहे.
आज कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असताना देखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहे, त्यांचे गत अनेक महिन्यांपासून पगार करण्यात आले नसून तरी देखील सुद्धा ते एक मिशन व सेवा म्हणून कार्य करत आहेत.
त्यांच्या या कार्यासाठी त्यांना स्फूर्ती किंवा शाबासकीची थाप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेले हे बेताल वक्तव्य डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहे. अपमानजनक आहे. असे भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अभिनेता संजय दत्त नियमित चेकअपसाठी लिलावतीमध्ये...भारतातच उपचार सुरु केल्याची चर्चा
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांचा केलेला हा अपमान वाईट आहे. भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी डॉक्टर्स अशी मागणी आणि आवाहन करतो की, खासदार संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी. या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करत आहोत डॉ. गोपछडे म्हणाले.