पुणे - पत्रकारिता करून राजकारणात आलो, पण मला कधी मंत्री व्हावे, असे वाटले नाही. अनेक जण विचारतात पण, मंत्रिपदापेक्षा मला सामनाचे संपादक पद मोठे वाटते. मी ठरवून पत्रकारितेतच आलो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला संपादित केले. पत्रकाराला भूमिका असायला पाहिजे. तो कुठल्या पक्षाचा असला तरी फरक पडत नाही, असे मत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - दिल्लीतील चित्र 2024 ला पूर्णपणे बदलेल - संजय राऊत
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ज.स. करंदीकर स्मृती व्याख्यान आज पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार तसेच 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे 'बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आजकालची पिढी लिखाण करण्याचे विसरली आहे
व्याख्यान देणे आपला प्रांत नाही. आपल्याला भाषण करण्याची सवय. आम्ही पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा व्यक्त होण्यासाठी लिखाण हे एकमेव साधन होते. आज अनेक साधन उपलब्ध आहेत. आजकालची पिढी लिखाण करण्याचे विसरली आहे. कागदाला पेन लावला जात नाही. आज ऑनलाईन अभ्यास केला जात आहे. आपली भाषा ही कागदावर उतरवता आली पाहिजे. आज वृत्तपत्र प्रतक्ष्य वाचण्याची सवय कमी झाली आहे. आजकाल मोबाईलवर वृत्तपत्र वाचली जातात. त्यामुळे, प्रिंट मीडियाचा खप वाढत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.
पत्रकारांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येण्याचे बंद करून टाकले
समाजात, देशात क्रांती करण्याची ताकद आजही छापील मीडियामध्ये आहे. याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र, त्यापुढील आव्हान दिवसेंदिवस बिकट होण्याची शक्यता वाटत आहे. कोरोनाच्या नावाखाली पत्रकारांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येण्याचे बंद करून टाकले आहे. अशाप्रकारे स्वतंत्र पत्रकारितेवर बंधने लादली जात आहेत. संसदेमध्ये पत्रकारांना येण्यापासून रोखू नये. यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही. दिल्लीतील सरकारकडून विरोधी विचारांच्या संस्थांवर बंधने घातली जात आहेत. केंद्रातील मंत्री कुठल्या पत्रकाराशी बोलतो, यावर पण दिल्लीतील सरकार लक्ष ठेवत आहे. देशातल्या राज्यकर्त्यांना स्वतंत्र मीडिया नको आहे. आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल, तर ते सरकारला आवडत नाही. वृत्तपत्र वाचणाऱ्यांचा आज देशातील आकडा १५ कोटी देखील नाही. वृत्तपत्र टिकावे, असे सरकारला वाटत नाही. वृत्तपत्रांना लागणारा कागद देखील आज परदेशातून आणावा लागत आहे, असे देखील राऊत म्हणाले.
राज्यकर्त्यांना भांडवलदार वृत्तपत्र समूह उभे करायचे आहे
कोरोनामध्ये गंगा नदीत मृतदेह वाहले. याबाबत एका संस्थेने फोटो छापले, तर १८ दिवसानंतर संबंधित वृत्तपत्र समुहावर केंद्राने छापा टाकला. आज राज्यकर्त्यांना भांडवलदार वृत्तपत्र समूह उभे करायचे आहे. म्हणजे, सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकते. आज देशातील पेट्रोल, डिझेल यावर मीडिया लक्ष देत नाही. मात्र, एखाद्या प्रकरणात अडकलेल्या मुलावर २४ तास बातम्या चालवल्या जातात. त्यामुळे, अशा बातम्यांकडे मनोरंजन म्हणून बघायचे का? वृत्तपत्र जनतेचा आवाज आहे, असे आपण म्हणतो. तेव्हा जनतेशी आपण प्रामाणिक राहिल पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.
आज मी जेथे आहे ते केवळ पत्रकरीतेमुळे
पत्रकारिता हा लोकशाहीचा खरा आत्मा आहे. आज मी जेथे आहे ते केवळ पत्रकरीतेमुळे आहे. कसेल त्याची जमीन आणि लिहीन त्याचे वृत्तपत्र, असे गणित होते. आज लिखाण करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आज व्यवस्थापकीय धोरणानुसार वृत्तपत्र छापले जात आहे. वाचनातला जो आनंद आहे तो डिजिटलमध्ये नाही, असे देखील राऊत म्हणाले.
कोरोनात डॉक्टर आणि पत्रकारांनी खरे फिल्डवर्क केले
कोरोनात डॉक्टर, पत्रकारांनी खरे फिल्डवर्क केले. आपण राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये. शंभर टक्के पथ्य पळता येणार नाही, पण शक्य तेवढे पथ्य आपण पाळले पाहिजे. आव्हानाला तोंड देऊन पत्रकारिता टिकून ठेऊ, असा विश्वास देखील यावेळी राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीला आजपासून पुन्हा प्रारंभ