मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. भाजपच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? ते सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? अशा शब्दात राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते.
हेही वाचा - Genomic Sequencing Test : मुंबईतच होणार जिनोमिक सिक्वेनसिंग चाचण्या, कस्तुरबा रुग्णालयात प्रयोगशाळा
हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीने छापे टाकले. इडीने यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नाहीत. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी पुन्हा युती करावी, अशी मागणी केली. या दोन मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारलाही लक्ष्य करत आहेत. मात्र, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
एकत्र बसून निर्णय
मुख्यमंत्री, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावले टाकतील, असा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, “अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्धा समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातल्या ११ कोटी जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावले टाकतील, असे राऊत यांनी सांगितले.
विरोधकांना दृष्टीदोष
महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत चांगली कामे केली आहेत. विरोधकांना मात्र ते दिसत नाही. त्यांना दृष्टीदोष झाला आहे, असा आरोप राऊत यांनी केला. कोरोना संकट नसते तर अधिक जोमाने कामे करता आली असती, असेही राऊत म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संन्यास घेण्याची भाषा केली. ते दुर्दैवी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - इस्त्रायलच्या दुतावासाचे खास मराठी ट्विट; 'या' कारणाने उद्धव ठाकरेंचे मानले आभार