मुंबई - देशात पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक बोलावली होती. प्रतिबंधक उपाय करण्यासाठी सुरू झालेली ही बैठक काही वेळाने महागाई व पेट्रोल, डिझेलच्या दरांवर सुरू झाली. यात पंतप्रधानांनी राज्यांनी देखील इंधनांवरचे कर कमी करावेत असे आवाहन केले. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हटलय राऊत यांनी? - काल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यावर मी बोलणे योग्य नाही. ही कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी आयोजित केलेली बैठक होती. पण पंतप्रधानांनी इतर विषयांवरतीच जास्त तारा छेडल्या. ममता बॅनर्जी, केसी राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की ही एकतर्फी झालेली बैठक होती. पण या बैठकीत बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झाल्याचं तुम्हाला बघायला मिळेल. पंतप्रधान कडून ही अपेक्षा नाही, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - Ravi Rana Birthday : वाढदिवसानिमित्त राणांच्या घरासमोर दिव्यांची आरास; तर उद्या वृद्धांना कपडे वाटप
त्यांना उत्तर द्यावीच लागतील - काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक युसूफ लाकडावाला याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाकडावाला सोबतचे फोटो पोस्ट केले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "हा मूळ मुद्दा भरकटण्याचे काम आहे. मोबाईलच्या जमान्यात कोण, कधी, कुठे, कुणासोबत येऊन फोटो काढेल सांगता येत नाही. समोरच्याला माहिती देखील नसते की आपल्या सोबत कोण, कधी फोटो काढले. त्यामुळे कुणी कुणा सोबत फोटो काढले हा मुद्दा नसून अंडरवर्ल्ड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकांसोबत कोणी आर्थिक व्यवहार केले? हा आहे. याची त्यांना उत्तर द्यावीच लागतील." दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपांवरून आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतात. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.