मुंबई - विधानपरिषद निवडणुकीच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय ( Maharashtra All Party Mlas In Mumbai Luxury Hotel ) निवडला आहे. या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरीही मत फुटण्याची भीती कायम आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यसभा निवडणुकीत आमदारांना दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला तोंडघशी पडावे लागले आहे. सर्व आमदारांना एकत्र बांधून ठेवल्यानंतरही महाविकास आघाडीला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकासआघाडी सरकारमधल्या घटक पक्षांनी आणि विरोधकांनी आपापल्या आमदारांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल वेस्ट इनमध्ये ठेवले आहे. तर, भाजपने ताज हॉटेलचा आधार निवडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे.
काय आहे हॉटेल पॉलिटिक्स? - आपल्या पक्षाच्या आमदारांनी अन्य कुठेही जाऊ नये. दुसऱ्या उमेदवाराला मतदान होऊ नये यासाठी सातत्याने त्यांना पक्षनिष्ठा आणि पक्षाची धोरणे तसेच एकजुटीचे महत्त्व या हॉटेल वास्तव्यादरम्यान सांगितले जाते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार मार्गदर्शन दिले जाते. आपल्या पक्षाची मते एकसंघ राहावी आणि एकजुटीची भावना कायम रहावी यासाठी सर्वांना एकत्र ठेवण्याचा पक्षांकडून प्रयत्न केला जातो.
किती होणार आहे हॉटेलवर खर्च?- शिवसेनेने आपल्या आमदारांना वेस्ट ईन हॉटेलमध्ये ठेवले आहे. या हॉटेलमधील सुपीरियर रूमचे भाडे दहा हजार पाचशे रुपये आहे. हिल व्यू रूमचे भाडे बारा हजार पाचशे, तर क्लब रूमचे भाडे 13 हजार 500 रुपये आहे. जरी शिवसेनेचा 54 आमदारांची भाड्याची बेरीज केली तरी प्रत्येक दिवशी साडे पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम ही भाड्यात जाणार आहे. चार दिवसांचे भाडे 23 लाख रुपयांपेक्षा अधिक होणार आहे. तर, खाण्यापिण्याचा आणि करमणुकीचा खर्च हा वेगळा असणार आहे. त्यामुळे ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे. या ठिकाणी रूमचे दिवसाचे भाडे 18, 500, प्रीमियम रूमचे भाडे 22 हजार पाचशे आणि प्रीमियम ओनरशिप भाडे चोवीस हजार पाचशे रुपये आहे. कमीत कमी भाड्याचा जरी विचार केला तरी दिवसाला दहा लाखांहून अधिक रक्कम भाड्यात जाते. तर, 51 आमदारांसाठी चार दिवसांचा खर्च एक कोटीच्या घरात जातो. भाजपाने आपल्या आमदारांची व्यवस्था ताज हॉटेलमध्ये केली आहे. 106 आमदार ताज हॉटेलमध्ये आहेत. ताज हॉटेलमध्ये सुपीरियर रूमचे भाडे 9000 आहे. तर डीलक्स रूमचे भाडे साडे दहा हजार रुपये आहे. चार दिवसांचा या आमदारांचा राहण्याचा खर्च 45 लाख रुपये होतो. तर, खाण्यापिण्याचा आणि करमणुकीचा खर्च वेगळा असणार आहे. याशिवाय सत्ताधारी, विरोधाक, घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांचा सर्व खर्चे लाखोंच्या घरात जातो. एकूणच हॉटेल पॉलिटिक्समध्ये सर्वपक्षीय आमदार कोट्यवधींचा चुराडा करत आहे.
'मतं फुटण्याची भीती कायम' - विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी आमदारांची पक्षासोबत असलेली निष्ठा, दिलेली वागणूक, सरकारने दिलेली वागणूक आणि त्यांची नाराजी या सर्व घटकांचा मतदानावर परिणाम होत असतो. चार दिवस हॉटेलमध्ये ठेवल्याने आमदारांची नाराजी किती दूर होईल हा प्रश्नच आहे. तसेच, यावेळी गुप्त मतदान असल्याने नाराज आमदार नक्कीच आपली नाराजी मतपेटीत व्यक्त करतील, अशी भीती सर्व पक्षांना आहे. त्यामुळे जरी पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले तरी मतं फुटण्याची भीती कायम असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.
'महाविकास आघाडीची मतं फुटणार नाहीत' - गेल्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचे गणित मांडण्यात आम्हाला अपयश आले. त्यामुळे त्याचा फटका महाविकासआघाडीला बसला आहे, हे मान्य करत यावी अशा पद्धतीची चूक होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दत्ताजी देसाई यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमधील सर्व आमदार हे सरकारसोबत आहेत. आमदारांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकण्यासाठी त्यांना एकत्र ठेवलेले नाही. मात्र, यावेळी महाविकास आघाडीची मतं फुटणार नाहीत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नक्कीच निवडून येतील, असा विश्वासही दत्ताजी देसाई यांनी व्यक्त केला आहे.