मुंबई - भाजपच्यावतीने मुंबई मनपाच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्टेज आणि साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे.
पोलिसांचा बंदोबस्त - कांदिवली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. आज संध्याकाळी सात वाजता सभा होणार होती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सभेला उपस्थित राहणार होते. या पार्श्वभूमीवर स्टेज उभारण्याचे काम सुरू होते. मात्र मध्यरात्री एक वाजता शिवसैनिकांनी येथे येऊन गोंधळ घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत भाजपाच्या पोलखोल सभेला तीव्र विरोध केला. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचा पोलखोल सभेला विरोध दर्शवल्याने वातावरण तंग झाले होते. सध्या पोलिसांचा बंदोबस्त येथे वाढविण्यात आले आहे.