मुंबई - काही दिवसावर दसरा येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Ground ) दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे ( Brihanmumbai Municipal Corporation ) दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेण्याबाबत तीन वेळा पत्र दिल आहे. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने, शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
शिवसेनेना जाणार न्यायालयात : दसरा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेनेना आता न्यायालयात जाणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेतला जातो. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सोनं लुटण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून शिवसैनिक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क मैदानावर यायचे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत असतात. ही शिवसेनेची परंपरा आहे आणि परंपरागत हे मैदान दसऱ्याला शिवसेनेसाठी दिल जात. यासाठी रीतसर सर्वात प्रथम महानगरपालिकेकडे शिवसेनेकडून परवानगी ही मागण्यात आली आहे. मात्र अद्याप ती देण्यात आली नसल्याची खंत ही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
मैदानासाठी एकनाथ शिंदे गटाकडूनही केला होता अर्ज : दादर माहीम विधानसभा मतदारसंघातील आमदार सदा सरवणकर यांनीही एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असून दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाला परवानगी मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेत 30 ऑगस्टला अर्ज केला होता. यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र त्यानंतर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेलं मैदान हे दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटाला मिळावा अशा प्रकारचा अर्ज करण्यात आला. तो अर्ज मान्य ही झाला आहे. मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला दादर येथील शिवाजी पार्क मैदानासाठी चा अर्ज मान्य झालेला नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत.
शिवाजी पार्क मैदान देण्याबाबत परवानगी द्यावी : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याबाबत परवानगी मुंबई महानगरपालिकेने द्यावी. नाहीतर दसरा मेळाव्यासाठी उत्स्फूर्तपणे राज्यभरातून शिवसैनिक दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानात जमतील असा इशारा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी देण्याबाबत महानगरपालिकेच्या जी नोर्थ कार्यालयातून परवानगी मिळत असते. मात्र अद्याप ती परवानगी मिळाली नसल्याने शिवसेनेचे काही नेते जी नॉर्थ या महानगरपालिकेच्या कार्यालयात आज जाणार असल्याची माहिती मिळत आहे.