मुंबई - शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. मात्र बंडखोरी केल्यानंतरही ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात कोणीही बोलणार नाही, असा पवित्रा सर्व बंडखोर आमदारांनी घेतला होता. मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या आरोपानंतर आता बंडखोर आमदारही थेट उद्धव ठाकरे यांना टारगेट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना ( Eknath Shinde group and Shiv Sena ) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ( Mahavikas Aghadi ) शिवसेनेच्या आमदारांची कशी गळचेपी झाली हे सांगण्याचा सर्वच आमदारांनी प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवण्याची पूर्ण रणनीती आखली असून, पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठे राजकीय नुकसान झाले असते. आरोप-प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरते मर्यादित न राहता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडेही बंडखोर आमदारांनी आता आपला मोर्चा वळवला आहे.
आरोप-प्रत्यारोप : आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मराठवाडा दौरा केला. मराठवाड्यातून शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघात थेट आदित्य ठाकरे उतरत त्यांनी बंडखोरांना आवाहन दिले. या यात्रेतून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना गद्दार म्हणून सार्वजनिक ठिकाणी टीका केली. आदित्य ठाकरे यांची ही टीका बंडखोरांच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करण्यात आले. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर आदित्य ठाकरे यांनी आज संपर्क शिवसैनिकांशी आधी केला असता तर, आज त्यांना दौरा करायची वेळ आली नसती, अशी टीका केली. तर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान देत आम्हाला गद्दार म्हणू नका, असा इशाराही दिला आहे. तर तसेच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याकडून होणारी टीका ही योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावे, असे म्हणत वाढत चाललेला वाद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
बंडखोरांना पालापाचोळ्याची उपमा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांना पालापाचोळा म्हटले आहे. पालापाचोळा म्हटल्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये तीव्र नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत उमटली. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. याचा पालापाचोळा आणि इतिहास घडवला हे विसरू नका, असे मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरे यांना आठवण करून देण्यात आली आहे. तसेच 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख करणे आवर्जून टाळला आहे. शुभेच्छाच्या माध्यमातूनही थेट उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा काम आता बंडखोर आमदारांकडून सुरू झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लढाई अधिक तीव्र होणार : पक्षात सोबत बंडखोरी करता वेळी बंडखोर आमदारांनी आपला रोख राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कधी ठेवला होता. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळू दिला नाही. आमदारांचा खच्चीकरण करण्याचं काम केलं असा आरोप केला होता. तसेच शिवसेनेना संपूर्ण साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तयारी केली असल्याचा आरोप आमदारांकडून करण्यात आला. बंडखोर आमदार केवळ कारण देत आहेत. सर्व आमदारांनी आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपवण्यासाठी भाजपाशी हातमिळवणी करूनही बंडखोरी केली असल्याचा थेट आरोप ठाकरेंकडून करण्यात आला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आता अधिकच तीव्र होणार आहे. बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घालणारे ठाकरे कुटुंबीय आता बंडखोरांच्या विरोधात दंड थोपटून थेट मैदानात आहे. बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांसाठी तयार व्हावे, असे आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देत आहे. त्यामुळे पुढील काळात बंडखोर आमदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आदित्य ठाकरे साहित्य उद्धव ठाकरे यांना देखील टार्गेट करतील. आमदारांना आणि सामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी कधीही वेळ दिला नाही, असा गंभीर आरोप सातत्याने बंडखोर आमदारांकडून करण्यात येतोय. मात्र आता यापुढे थेट मातोश्रीवरील होणारा कारभारावर बंडखोर आमदारांकडून बोट ठेवलं जाईल, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केली आहे. मात्र मातोश्रीवर होणाऱ्या आरोपांची तेवढ्याच तिखट शब्दात उत्तर बंडखोर आमदारांना ठाकरेंकडून दिला जाईल, असेही प्रवीण पुरो म्हणाले.