मुंबई - भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपासोबत जाण्याचे सूतोवाच केले होते. मात्र चर्चा फिस्कटल्याने पक्षप्रमुखांनी तुमच्या स्तरावरती युती करण्याचे आदेश दिले होते. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच आम्ही भाजपासोबत युती केल्याचा, गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena rebel leader Rahul Shewale ) यांनी केला आहे. दिल्लीत आज ( मंगळवारी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
'...म्हणून युती फिस्कटली' : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. चार ते पाच वेळा दिल्लीत बैठकही झाल्या. माझ्यासह पाच खासदार यावेळी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान विधानसभेच्या अधिवेशनात भाजपाच्या 12 खासदारांवरती निलंबनाची कारवाई केली. एकीकडे युतीची चर्चा करत असताना दुसरीकडे भाजप आमदारांवर कारवाई करणे, हे भाजपा पक्ष नेतृत्वाला पटले नाही. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर, तुमच्या स्तरावर भाजपशी युती करा, असे आदेश दिले. त्यानुसार आम्ही आता भाजपासोबत युती केल्याचे गंभीर आणि खळबळजनक विधान राहुल शेवाळे यांनी केले.
'आम्ही एनडीएसोबतच' : एकनाथ शिंदे यांचे 20 जून रोजी बंड झाल्यानंतर ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी भाजपासोबत जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हाही ठाकरे यांनी तयारी दाखवली होती. मात्र संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी त्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत शिवसेना खासदारांना पुन्हा निवडून यायचे असेल तर भाजपासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही अनेकदा सांगूनही तो निर्णय न झाल्याने आम्ही आता भाजपासोबत जाण्याचे ठरविले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठींबा देऊन आम्ही एनडीएसोबतच आलो, असे शेवाळे यांनी सांगताना शिवसेना एनडीएतून अधिकृतरित्या बाहेर पडल्याचे पत्र नाही. तसेच यूपीएत प्रवेश केल्याचेही शिवसेनेकडे अधिकृत पत्र नसल्याचा दावा शेवाळे यांनी केला.
'उद्धव ठाकरेंनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले' : राज्य विधानसभेच्या २०१९ च्या वचननाम्यामध्ये भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बनवलेल्या वचननाम्यावर आधारित निवडणूक लढवली होती. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार सोबत जाऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला गेला. मात्र, आता हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा नारा दिला होता, तो पुढे नेण्यासाठी, त्यांचे धोरण पुढे नेण्यासाठी आम्ही भाजप सोबत आलो असून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, असे शेवाळे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीकर सरकारमध्ये ज्या तांत्रिक अडचणीत होत्या, अडीअडचणी येत होत्या. त्या सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूर केल्याचे शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान लोकप्रतिनिधींना येणाऱ्या तक्रारी वारंवार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या मात्र त्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.
हेही वाचा - शिवसेनेला धक्का ! 12 खासदारांचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे; खासदारांनी दिला एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा