मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या अभिरुप विधानसभेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षपार्ह विधान केले. मुंबईत याचे तीव्र पडसाद उमटले. लालबाग, परळ, शिवडी भागातील शिवसैनिकांनी भारतमाता सिनेमागृहासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेना स्टाइलने घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला.
नितेश राणेंचे आक्षेपार्ह विधान
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. भाजपाने यावर आक्षेप घेत, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना घेराव घातला. याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. या कारवाईच्या निषेधार्थ विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपा आमदारांनी विभानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली. नितेश राणे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का, यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान केले होते.
शिवसेना स्टाइलने घोषणाबाजी
मुंबईतील शिवसैनिकांनी राणे यांच्या या वक्तव्यानंतर आक्रमक पवित्रा घेत, भारतमाता सिनेमागृहासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेना स्टाइलने राणेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नितेश राणेंचा पुतळा जाळला. पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झपाटपीमुळे काही कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतले.
तोंड सांभाळून बोला - अजय चौधरी
आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांची माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावे, शिवसेना हे खपवून घेणार नाही, असा नितेश राणे यांना इशारा दिला.
नितेश राणे यांची सारवासारव
विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बर्याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, असे ट्विट नितेश राणे यांनी करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.