मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी अस्थिर झाली आहे, अशी चर्चा विरोधकांकडून पसरवली जाते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अमित शाह यांच्यात झालेल्या कथित भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, यावर आता संजय राऊत यांनी ट्विट करत पवार-शाह यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - राज्यात कोरोना स्थिती गंभीर.. लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या भेटीवर काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर भाष्य केलं होतं. मात्र, काही वेळातच राऊत यांनी ट्विट करत मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
काही वेळातच भूमिका बदलली
सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले होते की, पवार-शाह यांची भेट झाली तर चूक काय? कामानिमित्त भेट झाली असेल तर चूक काय?, असं राऊत यांनी म्हटलं होते. मात्र, काही वेळातच राऊत यांनी आपली मांडलेली भूमिका मागे घेत, अशी भेट झाली नसल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले होते राऊत
काय सस्पेन्स आहे. जर भेट झाली तर त्यात चुकीचं काय? आम्हीसुद्धा भेटू शकतो. राजकारणात कुठल्याच बैठकी या गुप्त नसतात. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या, दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं, असं राऊत म्हणाले होते.
हेही वाचा - शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत