मुंबई - शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ही माहिती शिवसेनेतील सूत्राने दिली आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सुर्यकांत महाडिक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत सुर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांनी भारत कामगार सेनेच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. महाडिक यांच्या कुटुंबाला दु:खातून बाहेर येण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना आहे.
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी दिला होता लढा-
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी २०१९ मध्ये भारतीय कामगार सेनेने आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व सुर्यकांत महाडिक यांनी केले होते. केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्या मुंबईमधील सहारा व डोमेस्टिक ही दोन्ही विमानतळ बंद करू, असा इशारा भारतीय कामगार सेनेने त्यावेळी दिला होता.