मुंबई - महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी समाप्त होईल. या राज्यसभेच्या सहा जागांमुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यातील पाच जागा या नक्की असून सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. ते नाव म्हणजे संभाजीराजे यांचे. संभाजीराजे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याने त्यांना महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे. यासंदर्भात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया ( Sanjay Raut On Sambhaji Raje Chhatrapati ) दिली आहे. 'आम्ही छत्रपती घराण्याचा मान ठेवूनच त्यांना शिवसेनेची राज्यसभेची ऑफर दिली होती' असे म्हटले आहे. ते आपल्या निवासस्थानी बोलत होते.
काय म्हणाले राऊत ? - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "संभाजीराजे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. आमच्या माहितीनुसार अजूनही ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी छत्रपती घराण्याचा मान ठेवून मुख्यमंत्री सहकार्य करतील, अशी आशा व्यक्त केली. पण, शिवसेनेने त्यांना छत्रपती घराण्याचा मान ठेवूनच राज्यसभेच्या तिकिटाची ऑफर दिली होती. त्यामुळे यावर आता आम्ही आणखी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही" असे राऊत यांनी म्हटले आहे.
त्यांनी मतांची जुळवाजुळव केली असेल - पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. याचा अर्थ त्यांची मतांची जुळवाजुळव झालेली आहे. 42 मतांची जुळवाजुळव करणे ज्याला शक्य असेल, तो राज्यसभेवर जातील. त्यामुळे संभाजीराजे यांची 42 मतांची जुळवाजुळव झाली असेल असे मला वाटते. त्यामुळेच ते आपल्या निर्णयावर ठाम असतील." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
2 जागा आमच्याच - "आता या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण सहा जागा आहेत. यात भाजपच्या वाट्याला दोन, काँग्रेसच्या वाट्याला एक, राष्ट्रवादीच्या वाट्याला एक आणि शिवसेनेच्या वाट्याला दोन अशा सहा जागा आहेत. शिवसेनेच्या वाट्याच्या दोन जागा आहेत. आम्हीच लढवू आणि तो कट्टर शिवसैनिकच असेल. आमच्या दोन जागा निवडून आणण्यासाठी जी मतांची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे, ती आमच्याकडून झालेली आहे. महाविकासआघाडीच्या जागा म्हणायच्या झाल्यास आमच्या एकूण चार जागा असतील." अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंह आणि शरद पवारांची युती.. संदीप देशपांडेंचा आरोप