मुंबई - राज्यात ठाकरे सरकार येऊन दोन वर्षे झाले आहेत. या दोन वर्षात राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेकडून "शिव संपर्क" अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच, यामध्ये पक्षवाढीसाठीही जनतेशी थेट संपर्क करण्यात येणार आहे. हे अभियान (22 ते 25)मार्च दरम्यान राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करणार
संपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामधील 19 जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुखांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी बारा वाजता सर्व खासदार जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
विदर्भावर शिवसेनेचे लक्ष
22 ते 25 मार्च दरम्यान होणारे 'शिव संपर्क अभियान' पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात आणि मराठवाडा येथे राबवले जाईल. विदर्भात खासकरून भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक आहे. त्यामुळे विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेने विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा असे एकूण 19 जिल्ह्यात संपर्क अभियान असून, खासदार या शिव संपर्क अभियानाचे काम स्वतः पाहणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोचवली जाणार
या अभियानासंदर्भात संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, खासदारांसोबत काम करतील. तसेच, प्रत्येक खासदाराला जिल्ह्यातील बारा पदाधिकाऱ्यांची टीम सोबत मदतीला असणार आहे. खासदार जिल्हाप्रमुख आणि बारा जणांच्या टीमच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोचवली जाणार आहेत.
हेही वाचा - Ukraine-Russia War 25th day : रशिया-युक्रेन युद्धाचा 25 वा दिवस! हजारो सैनिक ठार