मुंबई - शिवसेनेतील फूटीनंतर शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात गेला आहे. शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी बंडखोर शिंदे गटाकडून हादरे देण्यात येत आहेत. नुकतेच दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांची यामुळे डोकेदूखी वाढणार आहे.
घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी : निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला द्यावे, अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी शिवसेनेची आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी, यासह इतर मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर पाच न्यायधिशांचे घटनापीठ नेमले आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
या राज्यांनी दिला शिंदे सरकारला पाठिंबा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वीच महाराष्ट्राबाहेरील जवळपास 8 राज्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत आठ राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या भूमिकेचे स्वागत केले. न्यायालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरी शिवसेना सिध्द करण्यासाठी संघटनात्मक बांधणी सिध्द करावी लागणार आहे. शिवसेनेला गाळलेल्या गळतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे.