मुंबई - बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव ठेवले आहे. राज्यातील घडामोडी आता वाढणार आहेत. शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आक्षेप घेण्याची शक्यता आहेत. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक देखील सुरू होते या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बाबत काय निर्णय होतो हे देखील पहावे लागेल. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर शिंदे गटाने आपली शिवसेनाहीच खरी शिवसेना आहे असा दावा केला. यासंदर्भात एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्र पाठवून आपला गट खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळावी असा दावा करणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र शिंदे यांना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळणार का आणि शिवसेना पक्षाचे नाव मिळणार का याबाबत वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या संदर्भात आता काय होणार हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे .
शिवसेनेला केव्हा मिळाले निवडणूक चिन्ह: १९८८ मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांची नव्याने नोंदणी आणि प्रत्येकाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला धनुष्यबाण चिन्ह मिळाले तर बरे होईल, असे आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी असे पदाधिकारी दिल्लीला गेले आणि त्यांनी पक्ष नोंदणीसोबतच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवले. १९९० मध्ये या चिन्हावर शिवसेना पहिल्यांदा निवडणूक लढली आणि दक्षिण मुंबईतून वामनाराव महाडिक हे खासदार म्हणून संसदेत गेले.
धनुष्यबाणाच्या आधीची शिवसेना : निवडणूक आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांची नव्याने नोंदणी आणि प्रत्येकाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्याबाबतच्या सुचना केल्या आणि त्या नंतर सगळ्या पक्षांना अधिकृत चिन्ह मिळाले तत्पुर्वी म्हणजे निवडणूक चिन्ह मिळण्यापूर्वी शिवसेना कधी उगवता सूर्य, कधी नारळ, कधी ढाल-तलवार तर कधी रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत होती. तेव्हा शिवसेना राज्य पातळीवर सगळ्या निवडणुका लढवत नव्हती ज्या भागात प्राबल्य आहे तेथे निवडणूक लढवत होती. त्यानंतर हेच रेल्वे इंजिन राज ठाकरे यांनी तेच निवडणुक चिन्ह मनसेसाठी घेतले.
तरच नव्या गटाला मान्यता: विधिमंडळ पक्षात फूट पडण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांची गरज लागते तरच नव्या गटाला मान्यता मिळते अथवा त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. त्याचप्रमाणे पक्षावर दावा करण्यासाठी पक्षा मध्ये उभी फूट पडावी लागते. यासाठी पक्षाचे सदस्य आणि पदाधिकारी प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यामध्येही मोठ्या संख्येने फूट पडणे आवश्यक आहे. या संदर्भात रवी नायक खटल्यात कोर्टाने अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत फक्त विधीमंडळ पक्षात नाही तर मूळ पक्षातही फूट पडायला हवी असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा: यानंतरही नव्या गटाला मुळ पक्षावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जावे लागते त्यावर आयोग काय निर्णय देतो हे महत्त्वाचे आहे अन्यथा ही लढाई न्यायालयातही जाऊ शकते पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि नाव हवे असेल तर पक्षाचे पदाधिकारी सदस्य यांचाही दोन-तृतीयांश कोटा पूर्ण करावा लागतो अन्यथा मूळ गट कितीही छोटा असला आणि बाहेर पडलेला गट कितीही मोठा असला तरी पक्षाचे नाव आणि चिन्ह मूळ गटाकडे कायम राहते असेही भारतकुमार राऊत यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाला चिन्ह आणि नाव नाही : एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे सध्या तरी आमदारांचे पाठबळ जास्त दिसत आहे. पण शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख बदलण्याचे अधिकार २८२ सदस्य , आणि राष्ट्रीय कार्यकारीणिला दिलेले आहेत. यात विभागप्रमुख तसेच अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदासाठी केवळ आमदारांची जास्त संख्या हा मुद्दा तीतका महत्वाचा ठरत नाही. तर पक्षातून काढून टाकण्याचे अधिकार फक्त पक्षप्रमुखांना असल्याने शिंदे गटाचा दावा कायदेशिररीत्या फोल ठरण्याची शक्यता अधिक आहे.असे जाणकारांचे मत आहे.
निर्णयाचे अधिकार कुणाकडे: सध्या निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांनी नेमलेल्या प्रतोद हा विधानसभा उपाध्यक्ष कडून ग्राह्य धरणे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रति मान्यता दिली जात नाही एकनाथ शिंदे हे आपल्याला असलेल्या समर्थना बाबत राज्यपालांना पत्र देऊन सरकार बरखास्तीची मागणी करू शकतात. मात्र त्यानंतरही राज्यपाल थेट सरकार बरखास्त करू शकत नाहीत त्यांना विधानसभेत विश्वास मत घ्यावेच लागेल, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
दाव्याचा सोक्षमोक्ष कधी लागणार: शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाते पक्षाच्या स्थापनेपासून आहे. मराठी अस्मिता आणि मुंबईतील मराठी माणसांचे प्रश्न या पायावर पक्ष उभा राहिला आहे. मराठी अस्मिता आणि भूमिपुत्र हे दोन शब्द शिवसेनेसाठी सुरुवातीच्या काळात परवलीचे होते. या दोन्हीसाठी शिवसेनेने संघर्ष सुरू केला. शिवसेनेने याच दोन मुद्यांवर अनेक यशस्वी आंदोलने केली. मराठी माणसाच्या भल्यासाठी ढाण्या वाघ डरकाळी फोडून सदैव सज्ज अशी शिवसैनिक आणि शिवसेनेची भूमिका राहिली आहे. पुढील काळात बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. आजही हीच भूमिका उद्धव ठाकरे निभावत आहेत. या संपूर्ण कालावधीत धनुष्यबाण, वाघ आणि भगवा झेंडा या प्रतिकांचे आणि शिवसेनेचे अतूट नाते निर्माण झाले.
धनुष्यबाण हीच शिवसेनेची ओळख: धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह हीच शिवसेनेची मोठी ओळख आहे. शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेची निवडणूक १९६७ मध्ये पहिल्यांदाच लढवली. त्यावेळी शिवसेना हा पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता. पुढच्याच वर्षी म्हणजे १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. आता हेच शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाकडे जाणार यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.