मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. डोस घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांना लसीकरण करून घेण्याचेही आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.
जागतिक आरोग्य दिनी घेतली लस
जागतिक आरोग्य दिनीच शरद पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला हेही विशेष. ट्विटर खात्यावरून शरद पवार यांनी याची माहिती दिली आहे. "आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा." असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
1 मार्च रोजी घेतला पहिला डोस
शरद पवार यांनी कोरोना लसीचा पहिला डोस 1 मार्च रोजी घेतला होता. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पवार यांनी लसीकरण करून घेतले होते. यावेळी लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले होते.
30 मार्च रोजी पित्ताशयावरील शस्त्रक्रिया
शरद पवारांच्या पित्तायशयातील खडा काढण्याची शस्रक्रिया 30 मार्च रोजी झाली होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अर्धा तास ही शस्त्रक्रिया चालली होती. अचानकच त्रास सुरू झाल्यानंतर पवारांनी नियोजित पश्चिम बंगाल दौरा रद्द केला होता. शस्त्रक्रियेनंतर पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे, हे विशेष.
हेही वाचा - Covid19 vaccination : शरद पवारांनी घेतली कोरोना लस, महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते