मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यासाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन पार्थ पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत पार्थ पवार यांच्या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
पक्ष म्हणून आपल्या पक्षाची काही धोरणे आणि भूमिका या ठरलेली आहेत. त्यामुळे ती लक्षात घेऊनच तरुण नेत्यांनी वागले पाहिले, यासाठीच्या सूचना या बैठकीत दिल्या असल्याचे सांगण्यात येते. पार्थ पवारांमुळे आपल्याला माध्यमांपुढे येऊन खुलासा करावा लागला. त्यामुळे अशी वेळ पुन्हा येणार नाही, यासाठीची खबरदारी घेण्याची ताकीदही पवारांनी उपमुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, ही बैठक पक्षाच्या काही विषयांवर होती. पार्थ पवारांवर चर्चा झाली नाही. इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही ही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पवार कुटुंबियांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
हेही वाचा - पार्थ पवार इमॅच्युअर.. त्याच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार
सुशांत सिंग प्रकरणी जयंत पाटील यांनी सांगितले की, विरोधकांकडे आता काहीही राहिले नाही, यामुळे ते टीका करत आहेत. पार्थ पवार यांचे वैयक्तिक मत असू शकेल. आम्ही कोणताही खुलासा मागवणार नाही. तसेच पवार कुटुंबियांमध्ये कोणताही वाद नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर निघून गेल्याच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार हे बैठक सोडून निघून गेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच ते निघाले असल्याचा खुलासा केला. सिल्व्हर ओकवर झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, यांच्यासोबतच खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.