मुंबई - ड्रग्ज प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 19 दिवसांपासून तरुंगात आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नाकारला. त्यामुळे जामीन मिळू शकला नाही. आज शाहरूख खान आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला. शाहरूखला तीन आठवड्यांनी आर्यनला भेटण्यासाठी केवळ दहा मिनिटाची परवानगी कारागृह प्रशासनाने दिली.
क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला.
तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसेच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.
आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव -
मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकीलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. आर्यन खानच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.