मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे लेटरबॉम्ब, महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणानंतर राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकारी असा वाद रंगल्याचे चित्र आहे. यात विरोधकांनी उडी घेतल्याने हा वाद आणखी चिघळला. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आता सावध झाले असून त्यांनी मौनव्रत धारण केले आहे. मीडियाला देखील माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. राज्यातील प्रकरणामुळे अधिकारी वर्ग धास्तावल्याचे बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांकडूनच राज्याची प्रतिमा मलिन -
मुकेश अंबानी धमकी प्रकरण, मनसुख हिरेन हत्याकांड, मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी, सचिन वाझेला एनआयएकडून अटक, या घडामोडीनंतर राज्यातील वातवरण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंग यांच्याप्रमाणेच गुप्त वार्ता खात्यातील तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बदलीसाठी आर्थिक व्यवहार चालतात, असे आरोप केल्याचे पत्र उघडकीस आणले. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना टार्गेट केले. प्रशासनात भाजपा धार्जिणे अधिकारी उच्च पदावर असून त्यांची बदली करावी, असे मत काही नेत्यांनी मांडले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरुन जोरदार शाब्दिक युध्द रंगले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्राची गंभीर दखल घेत, अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले. कुंटे यांनी गुरुवारी राज्य अहवाल सादर केला. त्यात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करुन राज्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवला. यामुळे शुक्ला अडचणीत आल्या आहेत.
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट -
राज्य सरकारमधील गुप्त माहिती काही वरिष्ठ अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचत आहेत. प्रशासनातील अधिकारीच खबरी आहेत, असा मविआतील काही नेत्यांचा कयास आहे. अधिकाऱ्यांकडे बघण्याचा महाविकास आघाडीचा दृष्टीकोन सध्या बदलला आहे, अशी अधिकारी वर्गात चर्चा सुरू आहे. प्रशासकीय सेवेतील काही अधिकारी सध्या मविआ सरकारच्या रडारवर आले आहेत. या सगळ्या प्रकरणाशी आपण जोडले जाऊ नये, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी याची खबरदारी घेत आहेत. काही अधिकारी कोणत्याही व्यक्तीशी न बोललेलं, मीडियापासून चार हात लांब राहिलेलं बरं असा सूर आवळत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री अधिकाऱ्यांवर नाराज -
ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी फडणवीस सरकारच्या काळात जे अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ होते. त्यांना दूर ठेवावे, अशी सूचना केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी देखील फडणवीस सरकारच्या काळात काम केलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या सोबत ठेवले. माजी मुख्य सचिव आणि सध्याचे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता हे त्याचाच एक भाग होते. अजोय मेहता हे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळचे अधिकारी आहेत. फडणवीस यांनीच मुंबई महापालिकेत मेहता यांची वर्णी लावून शिवसेनेची कोंडी केली होती. तरीही फडणवीस सरकार पायउतार होताच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहता यांची प्रधानसचिव वर्णी लावली. काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली होती. परमबीर सिंग यांच्यावरही महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. राज्यातील या स्फोटक घटनाक्रमानंतर संघटना म्हणून याबाबत न बोललेल बरं, असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग. दि. कुलथे यांनी सांगितले.
हेही वाचा - आंध्र प्रदेशमध्ये रिक्षाचा मोठा अपघात; तिघे जागीच ठार