मुंबई - विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या गटारात पडून एक वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप कामदार (वय 68), असे गटारात वाहून गेलेल्या वृद्धाचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान रस्त्यावरून चालणारी एक व्यक्ती ड्रेनेज लाईनमध्ये पडल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली होती. अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने या ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील केले. परंतु पावसाच्या पाण्यात वाहून गेलेली ही व्यक्ती त्यांना मिळून आली नाही.
प्रदीप कामदार हे घटनास्थळापासून जवळच असलेल्या कल्पतरू इमारतीत राहतात. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून ते गायब आहेत. प्रदीप कामदार हे मित्रांकडे पार्टीसाठी घराबाहेर पडले होते. परंतु रात्री जोराचा पाऊस असल्यामुळे ते घरी येण्यासाठी परत फिरले. रात्री 8 .30 वाजताच्या दरम्यान त्यांचा घरच्यांशी संपर्क देखील झाला होता. यावेळी त्यांनी 10 ते 15 मिनिटात घरी येत असल्याची माहिती फोन वरून दिली होती. परंतु त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन मधून वाहून गेलेली व्यक्ती हे प्रदीप असावेत अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या बाबत प्रदीप कामदार यांचा मुलगा दिपेश कामदार यांनी सांगितले की, माझे वडील उघड्या गटारात पडून वाहून गेल्याची प्रथम दर्शनी माहिती आम्हाला एका पादचाऱ्याकडून मिळाली होती. आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दिली असून पोलीस व अग्निशमन दलाने या गटारात 2 दिवस तपास केला व रविवारी तपास थांबवला. या दरम्यान काहीही आढळून आले नाही. तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे की माझे वडील कुठे जरी आढळून आले तर माझ्याशी संपर्क करावा अथवा पोलिसांशी संपर्क करून आम्हाला सहकार्य करावे.