मुंबई- कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासन, गृह विभाग व मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.
यंदाच्या गणेशोत्सव उत्सवासाठी मुंबई पोलिसांकडून काही नियमावली जारी करण्यात आलेली आहे. ज्यात सार्वजनिक गणेश मूर्ती ही 4 फुटांची व घरगुती मूर्ती ही 2 फुटांची असावी त्याप्रमाणेच आरती व पूजा ही विसर्जनस्थळी न करता घरीच करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलेल आहे.
यंदा गणेशोत्सव दरम्यान मुंबई शहरात सशस्त्र दल , राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक , बीडीडीएस, मुंबई वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 5000 पेक्षा अधिक सीसीटीवीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मुंबई शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गणपती मंडळांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली असून , यासाठी स्वयंसेवक, एनसीसी, तटरक्षक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत घेतली जात आहे.
याबरोबरच स्थानिक पोलीस ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथक यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठलाही प्रकारचा घातपात होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच यंदा गणेश विसर्जना करिता मुंबई महापालिका मार्फत 167 कृत्रिम विसर्जन स्थळी तयार करण्यात आले आहेत . या ठिकाणीच येऊन गणेश विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच काही सामाजिक संस्था घरोघरी जाऊन विसर्जन गणेश मूर्ती गोळा करणार आहेत, यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.