मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता राज्यभरातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भातील प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे अखेर राज्यभरातील शाळांची घंटा वाजणार आहे.
हेही वाचा - आगामी निवडणुका नव्या ओबीसी अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात - खासदार सुनील तटकरे
- शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील -
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता शहरातील शाळा बंद ठेवण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला. त्यामुळे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. आता राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाने पाठवला होता. त्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या चार ऑक्टोंबरपासून शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार अशी चर्चा होती. आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - राज्यात दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार? - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
- कोरोना नियमावलीचे करावे लागणार पालन -
याआधीही शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्याबाबतची तयारी शिक्षण विभागाला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला पूर्ण करायची आहे. स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होणार आहे.