मुंबई - राज्य सरकारने आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, यात शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी कार्यालयांप्रमाणेच राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्येही पाच दिवसांचा आठवडा करा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
हेही वाचा... राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, अंमलबजावणीला शिवजंयतीचा मुहूर्त
महाराष्ट्र राज्य शिक्षक क्रांती संघटना, राज्य शिक्षक परिषद, अनुदानित शिक्षक संघटना आदी संघटनांनी ही मागणी केली आहे. तर राज्यात शाळांना यापूर्वीच पाच दिवसांचा आठवडा करण्याची मुभा आहे. त्याप्रमाणे शाळांतील तासांचे नियोजन करून काही शाळांमध्ये पाच दिवसांची शाळा आहे. तरीही सरकारने सरकारी कार्यालयांप्रमाणे शाळांनाही पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी म्हटले आहे.
पाच दिवसांच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यालयांचा समावेश आहे. मात्र, शैक्षणिक संस्थांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती व नियमावणी १९८१ यातील (२१) कार्यभार यासाठी नियम आहे. यात शाळांना ३८ तासांचा आठवडा लिहिलेला आहे. यासाठी सोमवार ते शुक्रवार अथवा शनिवारपर्यंत हा आठवडा पूर्ण करायचा आहे. त्यासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, बुधवारी घेतलेल्या निर्णयात सरकारला शाळांचा समावेश करण्यास काहीही हरकत नव्हती. त्यामुळे सरकारने शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी फेरविचार करावा, अशी मागणी घागस यांनी केली आहे. तर दुसरीकडे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही शाळांच्या पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी केली आहे. यासाठी माध्यामिक शाळा संहितेप्रमाणे हे धोरण शाळांना लागू करावे अशी मागणी केली आहे.
शिक्षकांच्या कार्यभारातील काय आहेत नियम...
पूर्णवेळ शिक्षकांना आठवड्यात 30 तास शाळेच्या आवारात हजर राहणे आवश्यक. तर, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कामाचे आणि उपस्थितीचे तास हे ३८.५ तास (यात भोजन सुट्टी धरून) आवश्यक आहेत. तर चपराशी आणि हमाल अथवा निम्नश्रेणी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ५० तास (यात भोजन सुट्टी धरून) निश्चित करण्यात आलेले आहेत.
नवीन निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना असे असतील कामाचे तास...
पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. परिणामत: एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.