मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे काही दिवसापासून आक्रमक शैलीत दिसत आहेत. आज राऊत यांनी रोखठोक मधून केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी एक ट्विट केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘बुरा न मानो होली है’ हे म्हणत राऊत यांनी एक शायराना अंदाजात ट्विट केले आहे.
महाविकास आघाडीसमोरील संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष विकास आघाडीची कोंडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुद्धा आरोपांच्या फेऱ्या विरोधकांकडून झाडल्या जात आहेत. अशा राजकीय परिस्थितीत आलेल्या होळीनिमित्त संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. “आसमान मे उडने की मनाही नही है, बस शर्त इतनी है कि जमीन को नजर अंदाज ना करे” असं राऊत यांनी म्हटलं आहे. या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते -पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, हे विसरुन कसे चालेल? असा सवाल करत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वातील सरकारला घरचा आहेर दिला आहे.
अजित पवारांनी राऊतांना फटकारले -
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले', असे जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. यावर महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.