मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. फोर्टीस रुग्णालयात जाऊन त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले.
कोव्हिशील्डचा दुसरा डोस
राऊत यांनी कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी लसीचा पहिला डोस दिल्लीत घेतला होता. पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटच्या कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. यावेळी लसीवरून राजकारण थांबविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. देशात लसीकरणाची नितांत गरज असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी मुंबईत 47 हजार लाभार्थ्यांना लस
दरम्यान, मुंबईत शुक्रवारी 47 हजार 724 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 36 हजार 728 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 996 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 लाख 91 हजार 153 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 लाख 59 हजार 658 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 31 हजार 495 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 63 हजार 431 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 91 हजार 894 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 31 हजार 692 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 04 हजार 136 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 27 हजार 355 तर आतापर्यंत 12 लाख 21 हजार 407 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 267 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 34 हजार 022 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 15 हजार 102 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 35 हजार 724 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.