मुंबई - महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट सध्या विरोधी पक्षात आहे. त्यातच शिवसेनेचे नेते, खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीच्या ससेमिरा लागला आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शनिवारी पनवेल येथे भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी 'काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री' केल्याचं म्हटलं. यावरून आता भाजपला विरोधी पक्षांकडून कोंडीत पकडले जात असून यावर संजय राऊत यांनी आता भाष्य केलं आहे. ते आपल्या निवास्थानी माध्यमांशी बोलत होते.
दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद - यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, "आमचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रचंड गर्दी आहे जनतेची. आता आदित्य ठाकरे यांच्या नंतर स्वतः उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत. लोक अक्षरशः रडत आहेत. महाराष्ट्राचे काही झालं ते इथल्या जनतेला पटलेलं नाही. आता आदित्य ठाकरे नंतर उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडले की तुम्हाला एक वेगळे चित्र इथं पाहायला मिळेल."
किती वेळा दिल्लीला जाल?- शनिवारी पनवेल येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांचा '9 वाजता बोलणारे कमी झाले' असा उल्लेख केला. यावर आता संजय राऊत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, "त्यांना देखील माझा लाऊड स्पीकर एकावं लागतो. कारण, सरकार कधी पडणार याच्या पिपाण्या वाजवल्या जातं होत्या. परंतु आमचा लाऊड स्पीकर हा महाराष्ट्राचा आवाज आहे. भोंगे आणि लाऊड स्पीकर यात फरक आहे. आमचा लाऊड स्पीकर मागच्या 56 वर्षांपासून सुरु आहे. तुम्ही सरकार सांभाळा. लवकरच अंतर्गत कलाहाने हे सरकार पडेल. हे सरकार राहणार नाही. किती वेळा दिल्लीला जाल."
देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचं चॅलेंज - पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले असून, हा लाऊड स्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, "हा लाऊस्पिकर तुम्हाला बधीर केल्या शिवाय राहणार नाही मिस्टर फडणवीस... तुम्ही ईडी, सीबीआय माझ्या मागे लावा अन्य कोणत्या तपास यंत्रणा असतील तर त्या सुद्धा माझ्या मागे लावा. पण, मी मागे हटणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावं त्यांची आनेक कटकारस्थाने माझ्याकडे आहेत. त्यामुळें I am ready to face any Action." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक