मुंबई - संजय राऊतांविरोधात ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्र आणखी खुलासे करण्यात आले आहेत. ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांना आरोपी नंबर 5 म्हणून दाखवलेले आहे. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच प्रविण राऊतच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार या नात्याने संजय राऊतचं सारे व्यवहार करत असल्याचा दावा देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी केंद्रातील आपले वजन या प्रकरणांमध्ये वापरले. ईडीच्या वतीने आरोप पत्रात हा दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे.
राऊत मोठे राष्ट्रीय नेते - संजय राऊतांनी दरम्यानच्या काळात या प्रकरणातील साक्षी पुराव्यांशी छेडछाड केली तसेच तपासयंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. याशिवाय संजय राऊत यांनी याप्रकरणाती साक्षीदाराला थेट धमकवल्याचेही पुरावे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये. राऊत यांना जामीन देण्यात आला तर या प्रकरणातील तपासावर त्याचा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राऊत मोठे राष्ट्रीय नेते असल्याने त्याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता असल्याचे ईडीच्यावतीने सांगण्यात आले.
प्रश्नांची समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत - प्रविण राऊतला एचडीआयएकडून 112 कोटी मिळाले होते. ते संजय आणि वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2009 - 2011 या काळात 1 कोटी 06 लाख 44 हजार 375 रूपये प्रविण राऊतच्या खात्यातून पाठवण्यात आले होते असे देखील ईडीने म्हटले आहे. ही रक्कम राऊत यांना कशासाठी मिळाली? याचा तपास होणं गरजेचं असल्याचे ईडीच्या वतीने म्हटले आहे. संजय राऊत ईडी कस्टडीत असताना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. राऊत या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा करत असले तरी याच्याशी संबंधित अनेक बैठकांनी त्यांनी हजेरी लावल्याचे पुरावे ईडीकडे असल्याचा दावा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
अनेक कागदपत्रे आणि रोकड हस्तगत - संजय राऊत यांच्या भांडूप आणि दादर मधील निवासस्थानी घेतलेल्या झडतीत अनेक कागदपत्रे आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. 11 लाख 50 हजारांची रोकड आणि अलिबाग पट्यात 5 विविध जमीनींचे कोट्यावधींचे प्लॉट विकत घेतल्याचे पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत. याशिवाय प्रविण राऊत, संजय राऊत, वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची भागिदारीत 11 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे पुरावे ईडीला मिळाला असल्याचा दावा केला आहे.
मनी लाँड्रिंग झाल्याचा दाट संशय - राऊत यांच्या भांडूप येथील निवसास्थानी 5 आलिशान मोटारी उभ्या असतात. मात्र राऊत हे फक्त त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या पत्यावर नोंदणी झालेली फोर्ड मोटार वापरतात. या संपूर्ण प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा दाट संशय वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी पीएमएलए नुसार याची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही जामीन देऊ नये असे ईडीच्या वतीने म्हटले आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणा ईडीने आतापर्यंत या लोकांविरोधात प्रवीण राऊत, राकेश वादवान, सारंग वादवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आणि संजय राऊत आरोपी आहे. संजय राऊत यांच्या विरोधात देखील आरोप पत्र दाखल करण्यात आले असून हे आरोप पत्र 74 पानाचे आहे तर या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकूण आरोप पत्र 1000 पानापेक्षा अधिक आहे.
संजय राऊत यांच्यावरील आरोपपत्र प्रमुख ठळक मुद्दे -
- संजय राऊत यांनी कलम 3 नुसार परिभाषित केल्यानुसार 3,27,85,475/- रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये जाणूनबुजून स्वत: लाँडरिंग केले आहे आणि ते पीएमएलए, 2002 च्या कलम 4 अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत
- संजय राजाराम राऊत हे प्रवीण राऊतयांच्या मार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वित होईपर्यंत त्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला
- 2006-07 संजय राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसर्या बैठकीस हजेरी लावली होती
- त्यानंतर राकेश वाधवन यांना मेसर्स गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मार्फत पत्रा चाळ प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी आणले
- प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी प्रवीण राऊत यांना त्यांचे प्रॉक्सी आणि विश्वासपात्र म्हणून समाविष्ट केले
- मनी ट्रेलच्या तपासात असेही समोर आले आहे की प्रवीण राऊतने या संजय राऊत यांच्या प्रॉक्सीने HDIL कडून त्याच्या बँक खात्यात सुमारे 112 कोटी रुपये प्राप्त केले आणि पुढे ते मालमत्ता संपादन करणे, त्याच्या व्यावसायिक संस्था, कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळवणे इत्यादींमध्ये हस्तांतरित केले. अशा प्रकारे, संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्ह्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आणि मालमत्तेचे संपादन करण्यासाठी आणि इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत
- किहीम, अलिबाग येथील जमीन खरेदी करताना संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली तीतपासात पुढे आले आहे, ज्याची काही विक्रेत्यांनी पुष्टी केली आहे
- खासदार म्हणून संजय राऊत यांना महिन्याला 1 लाख 85 हजार आणि सामना वर्तमानपत्रात काम करतात तिथे महिना एक लाख मिळतो
- त्यांच्या पत्नी वर्षा या शिक्षिका असून त्यांना महिन्याला 80 हजार पगार मिळतो
- नोकरीशिवाय कोणताही व्यवसाय राऊत करत नाहीत